Shivsena Mla Disqualification : अपात्रतेसंदर्भात उत्तर देण्यासाठी शिवसेना आमदारांना मुदतवाढ

मुंबई :- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या 40 आमदारांना अपात्रतेसंदर्भात उत्तर देण्यासाठी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दोन आठवड्यांची मुदतवाढ दिली आहे.
यासंदर्भात त्यांना उत्तर दाखल करायचे होते, तसे पत्र विधानसभा अध्यक्षांनी शिवसेनेच्या सर्व आमदारांना पाठवले होते. विशेष म्हणजे अध्यक्षांनी ठाकरे आणि शिंदे या दोन्ही गटाच्या आमदारांना उत्तर देण्यासाठी नोटीस पाठवली होती.
या संदर्भात शिंदे गटाच्या आमदारांनी आणखी मुदत देण्यात यावी, अशी मागणी केली होती. त्यानुसार नार्वेकर यांनी मुदतवाढ देण्याचा हा निर्णय घेतला आहे.
राज्यातील सत्तांतराच्या नाट्यानंतर शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात आमदारांच्या अपात्रतेचा संदर्भात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर निर्णय देताना सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांचे अधिकार अबाधित ठेवत, या संदर्भात निर्णय घेण्याचे निर्देश विधानसभा अध्यक्षांना दिले होते.
त्यानुसार विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांनी सर्व आमदारांना नोटीस पाठवत आपले म्हणणे मांडण्यासाठी सांगितले होते.





