विधानसभा निवडणुकीआधी शिंदे गटाच्या ‘या’ 2 नेत्यांना मिळाला मंत्रीपदाचा दर्जा

मुंबई : दोन वर्षांपूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणात एक मोठी राजकीय उलथापालथ पाहायला मिळाली. सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 40आमदारांसह शिवसेनेतून बंड करून सरकारमध्ये सामील झाले. विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर एकनाथ शिंदे आमदारांसह मुंबईहून सुरतला गेले होते. तेव्हापासून आमदार संजय शिरसाट हे मुख्यमंत्र्यांसोबत होते. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली तेव्हापासून संजय शिरसाट यांना मंत्रिपद मिळेल अशी आशा होती मात्र त्यांना मंत्रीपदाने हुलकावणी दिली.
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. निवडणूक आयोग कधीही आचारसंहिता लावू शकते, त्यामुळे आता मंत्रिमंडळ विस्तार व्हायची शक्यता कमी आहे. मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आता जवळजवळ मावळली आहे. मात्र यादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संजय शिरसाट यांच्यावर मोठी जबाबदारी दिली आहे. संजय शिरसाट यांची सिडकोच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. सिडकोच्या अध्यक्षपदाला मंत्रिपदाचा दर्जाही आहे. संजय शिरसाट हे सध्या शिवसेनेचे प्रवक्तेही आहेत.
तर दुसरीकडे शिवसेनेचे माजी खासदार हेमंत पाटील यांचंही राजकीय पुनर्वसन करण्यात आलं आहे. हेमंत पाटील यांना राज्यमंत्रीपदाचा दर्जा देण्यात आला आहे. हेमंत पाटील यांची बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन आणि प्रशिक्षण केंद्राचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. हेमंत पाटील हे हिंगोलीचे शिवसेनेचे माजी खासदार आहेत. लोकसभा निवडणुकीत हेमंत पाटील यांना शिवसेनेने उमेदवारी दिली, पण शेवटच्या क्षणी हेमंत पाटलांची उमेदवारी मागे घेऊन त्यांच्याऐवजी हिंगोलीतून बाबुराव कदम कोहळीकर यांना उमेदवारी देण्यात आली होती.





