मुख्यमंत्री शिंदेंना शहीद करण्याचा प्रयत्न होता; संजय शिरसाट यांचा खळबळजनक दावा

छत्रपती संभाजीनगर : शुक्रवारी २७ सप्टेंबर रोजी आनंद दिघे यांच्यावर आधारित ‘धर्मवीर २’ चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला. यानंतर संजय शिरसाट यांनी खळबळजनक दावा केला. आनंद दिघे यांचा मृत्यू नैसर्गिक नसल्याचा दावा त्यांनी केला होता. यानंतर राज्यभरात शिरसाट यांच्या विधानावरून उलटसुलट प्रतिक्रिया समोर आल्या. आता संजय शिरसाट यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत खळबळजनक दावा केला आहे.
नेमके काय म्हणाले संजय शिरसाट?
‘‘काल मी दिघे साहेब यांच्या मृत्यु संदर्भात वक्तव्य केले त्याचे पडसाद राज्यभर उमटले. मात्र माझी जी शंका होती त्यावर मी बोललो. दिघे साहेबांवर बाळासाहेबांचे अतोनात प्रेम होते. दिघे साहेबांनी कधी बाळासाहेबांच्या बाजूला देखील बसण्याची हिंमत केली नाही. दिघे साहेब किंग होतायत याची खूनस काहींना होती त्यामुळे हे सर्व झाले.’’असे संजय शिरसाट म्हणाले.
‘‘दादर मध्ये एक मेळावा झाला त्यात गद्दार नेता नव्हता. त्यावेळी आनंद दिघे साहेब त्याला शोधत होते. राज ठाकरे का गेले? कुणामुळे गेले? याची कारण काय? हे सर्व लोक कुणाच्यामुळे गेले हे समोर आलेले नाही. त्यांची अडचण होणाऱ्या लोकांनीच त्यांचा खून केला असा माझा आरोपदेखील संजय शिरसाट यांनी यावेळी केला.
मुख्यमंत्री शिंदेबाबत खळबळजनक दावा
‘‘एकनाथ शिंदे यांना शहीद करण्याचा प्रयत्न होता. शिंदे यांना झेड प्लस सुरक्षा देण्याबद्दलच्या फाईलवर यांनी सही का केली नव्हती? शिंदे साहेबांना नक्षलवाद्यांकडून धमक्या देणारे पत्र आलेले तरीही झेड प्लस का दिली नाही? याचा अर्थ असाच होतो त्यांना शहीद करायचे होते.’’ असा खळबळजनक दावा संजय शिरसाट यांनी केला आहे.





