पिंपरीमधून गौतम चाबुकस्वारांना शिवसेनेची उमेदवारी

‘एबी’ फॉर्म मिळाल्याचा दावा
पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरातील युतीचे जागावाटप अद्याप जाहीर झालेले नसतानाच शिवसेनेने आपले उमेदवार जाहीर केले आहेत. पिंपरी विधानसभा मतदारसंघातून विद्यमान आमदार गौतम चाबुकस्वार यांना पुन्हा उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
उमेदवारीसोबतच “एबी’ फॉर्मही चाबुकस्वार यांना उद्धव ठाकरे यांनी सुपूर्द केला असून, त्याबाबतच छायाचित्र स्वत: चाबुकस्वार यांनीच प्रसिद्ध केले आहे. तर ही माहिती ई मेलद्वारे त्यांच्याकडून प्रसिद्धी माध्यमांना कळविण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकीसाठी येत्या 21 ऑक्टोबर रोजी मतदान होत आहेत. तत्पूर्वी 4 ऑक्टोबर ही उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख आहे. विधानसभेसाठी शिवसेना-भाजपाची युती होणार हे निश्चित असून, पिंपरीत सध्या शिवसेनेचे विद्यमान आमदार असल्याने हा मतदारसंघ शिवसेनेलाच मिळणार हे पूर्वीच निश्चित झाले होते. मात्र उमेदवारीसाठी या मतदारसंघात पक्षामधूनच मोठी चुरस सुरू होती.
राष्ट्रवादीचे माजी आमदार आण्णा बनसोडे, शिवसेनेचे नगरसेवक सचिन भोसले यांनी शिवसेनेकडे उमेदवारीसाठी प्रयत्न चालविले होते. तर रिपाईनेही युतीमध्ये हा मतदारसंघ आपल्याला मिळावा यासाठी प्रयत्न केले होते. मात्र सर्व चर्चांना आज पूर्णविराम मिळाला असून, स्वत: उद्धव ठाकरे यांनीच चाबुकस्वार यांची उमेदवारी जाहीर करत पुन्हा एकदा चाबुकस्वार यांच्यावर विश्वास दाखविला आहे.
‘कामााला लागा, विजयी व्हा’
उमेदवारीसाठी पक्षाचा “एबी’ फॉर्म स्वत: उद्धव ठाकरे यांनी गौतम चाबुकस्वार यांच्याकडे सुपूर्द केला. यावेळी आजपासूनच कामाला लागा आणि विजयी होऊन विधानसभेत परत या, अशा शब्दात ठाकरे यांनी शुभेच्छा दिल्या.





