शिवराजसिंह चौहान यांचा तुटलेल्या सीटवरून विमान प्रवास

भोपाळ : केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांना शनिवारी कटू अनुभव आला. चक्क तुटलेल्या सीटवरून हवाई प्रवास करण्याची वेळ त्यांच्यावर आली. त्याविषयी शिवराज यांनी तीव्र नाराजी व्यक्त केल्यानंतर एअर इंडियाने दिलगिरी व्यक्त केली. तसेच, संबंधित घटनेची सखोल चौकशी करण्याचा निर्णय घेतला. हवाई प्रवासात आलेला नकोसा अनुभव स्वत: शिवराज यांनी सोशल मीडियावरून शेअर केला.
भोपाळहून दिल्लीला जाण्यासाठी मी एअर इंडियाच्या एआय४३६ या विमानाचे तिकीट घेतले. त्या विमानातील ८सी क्रमांकाचे सीट मला देण्यात आले. त्या सीटवर मी जाऊन बसलो. मात्र, ते तुटलेले आणि खचलेले असल्याचे माझ्या ध्यानात आले. ती बाब मी विमान कर्मचाऱ्यांच्या कानावर घातली. खराब सीट का देण्यात आली, असा प्रश्न मी विचारला.
संबंधित सीट योग्य अवस्थेत नसल्याची माहिती आम्ही याआधीच कंपनी व्यवस्थापनाला दिल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले. खराब सीट प्रवाशांना दिली जाऊ नये. संबंधित विमानातील अनेक सीट खराब आहेत. काही सहप्रवाशांनी मला त्यांचे सीट देऊ केले. चांगल्या सीटवर बसण्याचा आग्रह त्यांनी केला. पण, मी माझ्या सोयीसाठी इतरांना त्रास कशासाठी द्यायचा? मी मला देण्यात आलेल्या सीटवरूनच प्रवास पूर्ण करण्याचा निर्णय घेतला, असे त्यांनी नमूद केले.
एअर इंडिया कंपनीची सुत्रे टाटा समुहाकडे गेल्याने सेवा सुधारली असणार, अशी माझी भावना होती. पण, तो भ्रम ठरला. माझ्या गैरसोयीची मला कुठली चिंता नाही. पण, प्रवाशांकडून पूर्ण शुल्क आकारून त्यांना खराब आणि त्रासदायक सीटवर बसवण्याची कृती अनैतिक आहे. प्रवाशांची ती फसवणूक नाही काय? भविष्यात कुठल्या प्रवाशाची गैरसोय होणार नाही.
यादृष्टीने एअर इंडिया व्यवस्थापन पाऊले उचलणार का? की प्रवाशांच्या निकडीचा गैरफायदा उठवत राहणार, अशा कडवट प्रश्नांची सरबत्तीही मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री असणाऱ्या शिवराज यांनी केली. थेट केंद्रीय मंत्र्यानेच नाराजी व्यक्त केल्याच्या घडामोडीची तातडीने दखल घेणे एअर इंडियाला भाग पडले. त्या कंपनीने दिलगिरी व्यक्त केली. त्याशिवाय, अशाप्रकारच्या घटनेची पुनरावृत्ती टाळण्याची निश्चिती करण्यासाठी सखोल चौकशीचेही आदेश दिले.
नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने घेतली दखल
शिवराज यांना तुटलेल्या सीटवर बसाव्या लागल्याच्या घटनेची गंभीर दखल केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने घेतली. त्या विभागाचे मंत्री के.राममोहन नायडू यांनी एअर इंडियाला आवश्यक ती कारवाई करण्याची सूचना केली. त्यांनी शिवराज यांच्याशीही फोनवरून संवाद साधला. त्याशिवाय, नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) एअर इंडियाकडून अहवाल मागवला.


