बँकेच्या लॉकरमध्ये आढळलं 500 कोटी किंमतीचं शिवलिंग; वजन केवळ…

नवी दिल्ली – देशात अनेक ठिकाणी पुरातण वस्तु सापडतात. मात्र या वस्तुंची किंमत किती असू शकते याची कल्पनाही आपण करू शकत नाही. मात्र सापडलेल्या प्राचीन वस्तु दुर्मिळ असल्याने त्यांची किंमत कोट्यवधी रुपये असते. अशीच प्राचीन वस्तु, तामिळनाडूमधून एका बँकेच्या लॉकरमध्ये आढळून आली आहे.
तमिळनाडूच्या तंजावूरमधील एका व्यावसायिकाच्या बँक लॉकरमध्ये एक प्राचीन शिवलिंग मिळालं. पाचूपासून बनलेलं हे शिवलिंग 530 ग्रॅमचं आहे. विशेष म्हणजे या 530 ग्रॅमच्या प्राचीन शिवलिंगाची किंमत 500 कोटी रुपये इतकी आहे. या शिवलिंगाची लांबी 8 सेंमी आहे. हे शिवलिंग या व्यावसायिकाकडे कसं आलं, याबद्दल सध्या काहीही माहिती समोर आलेली नसून प्रकरणाचा तपास सुरू आहे.
एडीजीपी जयंत मुरली यांनी सांगितलं की, तंजावूरमधील एका घरात अॅन्टिक मूर्ती ठेवलेली असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार शोध घेण्यात आला असता हे शिवलिंग आढळून आलं. हे शिवलिंग नागपट्टिनमजवळील थिरुक्कुवलई येथील थ्यागराज स्वामी मंदिरातून 2016 साली चोरी झालं होतं.
दरम्यान हे शिवलिंग कधी बनवलं गेलं याची माहिती मिळाली नाही. मात्र हे एक हजार वर्षापूर्वीच असल्याचं मानलं जात आहे. पोलिसांनी याप्रकरणी केस दाखल करत तपास सुरू केला आहे.





