पुणे जिल्हा | शिवाजीराव आढळराव पाटील स्वत:च्या आंबेगाव शिरूर विधानसभा मतदारसंघात पिछाडीवर

मंचर, (प्रतिनिधी) – महायुतीचे शिरूर लोकसभा मतदार संघाचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांना स्वताच्या आंबेगाव शिरूर विधानसभा मतदारसंघात पिछाडीवर रहावे लागले. महाविकास आघाडीचे अमोल कोल्हे यांना आघाडी मिळाली.
त्यामुळे सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील आणि उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांना स्वतःच्या विधानसभा मतदारसंघात पिछाडीवर रहावे लागल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. त्याचा परिणाम विधानसभा निवडणुकीवर होणार असल्याने वळसे पाटील विरोधकांना एक प्रकारे बळ मिळाल्याचे दिसून येते.
शिरूर लोकसभा मतदारसंघाचा निकाल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाच्या बाजूने लागला असून यामध्ये डॉ. अमोल कोल्हे यांचा दीड लाखापेक्षा जास्त मताने विजय झाला. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाच्या शिवाजीराव आढळराव पाटील यांना मात्र पराभवाचा सामना करावा लागला.
यामध्ये सर्वच विधानसभा मतदारसंघांमध्ये डॉ.अमोल कोल्हे यांना चांगल्या पद्धतीची आघाडी मिळाली. शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या स्वत:च्या आंबेगाव शिरूर विधानसभा मतदारसंघातही अमोल कोल्हे यांना आघाडी मिळाली आणि शिवाजीराव आढळराव पाटील यांना स्वतःच्या विधानसभा मतदारसंघात पिछाडी मिळाली.
त्यामुळेच आढळराव पाटील यांचा पराभव झाला. आंबेगाव तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद मोठी असतानाही आढळराव पाटील यांना मताधिक्य मिळाले नाही. निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना शिंदे गटातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात येऊन आढळराव पाटील यांनी तिकीट मिळवले. मात्र, स्थानिक कार्यकर्ते नेते यांच्याशी त्यांना संपर्क साधता आला नाही. त्याचप्रमाणे शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट या दोन पक्षाच्या कार्यकर्त्यांचे मनोमिलनही या निवडणुकीत चांगल्या पद्धतीने झाले नाही.
प्रचारांमध्येही हा अभाव अनेक ठिकाणी दिसून आला आणि म्हणूनच आढळराव पाटील यांना स्वतःच्या आंबेगाव शिरूर विधानसभा मतदारसंघातच आघाडी मिळवता आली नाही. यामध्ये विशेष करून आंबेगाव तालुक्यातील व शिरूर तालुक्यातील 42 गावातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे स्थानिक कार्यकर्ते त्याचप्रमाणे नेते त्यांच्यावर योग्य पद्धतीची जबाबदारी व विश्वास टाकला नसल्याचे काही कार्यकर्ते सांगत आहेत.
त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते व सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांना दुखापत झाल्याने त्यांनाही या निवडणुकीच्या प्रचारापासून लांबच राहावे लागले.
त्यामुळे एकंदरीतच महत्त्वाची व्यक्तीच निवडणूक प्रचारात नसल्याने कार्यकर्तेही प्रचारात त्या तुलनेत सक्रिय झाले नाही. वळसे पाटील प्रचारात नसल्याचा फटकाही आढळराव पाटील यांना बसला. त्यातच शरद पवार व उद्धव ठाकरे यांच्याविषयी असणारी लोकांमधील सहानुभूती आंबेगाव तालुक्यातही पहावयास मिळाली आणि त्यामुळे ही आंबेगाव शिरूर विधानसभा मतदारसंघात आढळराव पाटील यांना मताधिक्य मिळवता आले नाही.
एकंदरीतच प्रचार करत असतानाही कार्यकर्त्यांची वेगवेगळे गट पहावयास मिळाले. त्याचप्रमाणे अनेक कार्यकर्त्यांनी या प्रचारातून अंग काढून घेतल्याचे दिसुन आले. त्याचप्रमाणे आंबेगाव शिरूर मतदार संघात मोठ्या प्रमाणावर दूध व कांदा उत्पादक शेतकरी आहेत.
कांद्यामुळे बसला फटका
केंद्र सरकारच्या व राज्य सरकारच्या धोरणामुळे दुधाचे पडलेले बाजारभाव व कांद्याचा निर्माण झालेला प्रश्न यामुळे ही येथील शेतकरी मतदारांनी भाजप व मित्र पक्षाच्या महायुतीला नागरिकांनी नाकारल्याचे पहावयास मिळत आहे. आढळराव पाटील यांच्या पहिल्या तीन वेळच्या निवडणुकीत महत्त्वाचा ठरणारा बैलगाड्याचा मुद्दा ही या निवडणुकीत त्या तुलनेत चालला नाही.
हा मुद्दा कुठेतरी अमोल कोल्हे यांच्या अथ्यावर पडला आणि म्हणूनच शिवाजीराव आढळराव पाटील यांना स्वतःच्या आंबेगाव शिरूर विधानसभा मतदारसंघातच मताधिक्य मिळवता आले नाही आणि त्यामुळेच आढळराव पाटील यांना पराभवाचा सामना करावा लागल्याचे अनेक जाणकार सांगत आहेत.





