पुणे : 100 दिवसांनंतर शिवाजी मार्केट सुरू

पुणे – लष्कर परिसरातील मध्यवर्ती बाजारपेठ असलेल्या शिवाजी मार्केटमधील व्यवहार 100 दिवसांच्या विश्रांतीनंतर अखेर सुरू झाले आहेत. प्रायोगिक तत्त्वावर सुरू झालेल्या या बाजारपेठेत सुरक्षेच्या सर्व उपाययोजना राबविण्यात आल्या आहेत. पहिल्याच दिवशी ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळाल्याची माहिती व्यावसायिकांनी दिली.
करोनामुळे गेली तीन महिने बंद असलेले शिवाजी मार्केट अखेर तात्पुरत्या स्वरूपात खुले झाले. त्यामुळे नागरिकांना भाज्या, चिकन, मटण, मासे यासारख्या वस्तूंची खरेदी करण्यासाठी सोयीस्कर पर्याय उपलब्ध झाला. ही बाजारपेठ खुली करण्यासाठी बोर्डातर्फे विविध अटी घातल्या आहेत. त्यानुसार परिसरात स्वच्छता ठेवणे, सुरक्षिततेचे नियम राखणे या सर्व अटींचे पालन करण्याची जबाबदारी व्यावसायिकांवर आहे.
याबाबत मार्केटमधील व्यावसायिक शंकर सुर्वे म्हणाले, परिसरातील नागरिकांची सुरक्षितता राखण्यासाठी बाजारपेठेतील व्यावसायिक योग्य ती काळजी घेत आहेत. गर्दी होऊ नये, यासाठी बाजारपेठेच्या पाचपैकी तीनच गेट सुरू केले आहेत. याठिकाणी तापमान मोजणी यंत्र, सॅनिटायझर उपलब्ध करून दिले आहे. एकूणच ग्राहकांच्या सुरक्षेबाबत शक्य ती काळजी आम्ही घेत आहे.
हातगाड्यांवर व्हावी कारवाई
लॉकडाऊन काळात लष्कर परिसरातील सर्व बाजारपेठा बंद असल्याने भाजी, फळेविक्रेते यांचा सुळसुळाट झाला आहे. परिसरात अनेक ठिकाणी नागरिकांनी बेकायदेशीरपणे हातगाड्या लावल्या असून, त्यावर कोणाचेही नियंत्रण नाही. तसेच, या ठिकाणी होणाऱ्या गर्दीमुळे सुरक्षेचे कोणतेही नियम पाळले जात नसल्याने या हातगाड्यांवर बोर्डाने कारवाई करावी, अशी मागणीदेखील शिवाजी मार्केटमधील व्यावसायिकांकडून होत आहे.





