माजी राज्यमंत्री बांधणार शिवबंधन; मंत्री संजय राठोडांना शह देण्यासाठी शिवसेनेची रणनिती

यवतमाळ – यवतमाळ जिल्ह्यातील माजी राज्यमंत्री आणि दिग्रसचे माजी आमदार संजय देशमुख लवकरच शिवबंधनात अडकणार आहेत. त्यांनी काल, रविवारी अकोल्यात शिवसेना नेते खासदार अरविंद सावंत यांची गुप्त भेट घेतल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.
या भेटीवेळी बाळापूरचे शिवसेना आमदार नितीन देशमुख, शिवसेनेचे जेष्ठ नेते विजय मालोकार, अकोला जिल्हाप्रमुख गोपाल दातकर उपस्थित होते. यात खासदार अरविंद सावंतांसोबत प्रवेशासंदर्भात अंतिम बोलणी झाल्याचे समजते.
दरम्यान, दिग्रसचे माजी आमदार राहिलेल्या संजय देशमुख यांना सेनेत घेत शिंदे गटात गेलेल्या संजय राठोडांना शह देण्याचा प्रयत्न सेना नेतृत्वाचा प्रयत्न आहे. संजय देशमुखांची यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस, यवतमाळ आणि आर्णी मतदारसंघात मोठी ताकद आहे.
दरम्यान, यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस मतदारसंघाचे राजकारण 1999 पासून कायम दोन “संजय’भोवती फिरत आहे. विशेष म्हणजे दोघांचीही कारर्किद शिवसेनेतून सुरू झाली.
हे दोघे कधीकाळचे कट्टर मित्र होते. मात्र, आता कट्टर “राजकीय शत्रू’ आहेत. दिग्रसचे आमदार असलेल्या संजय राठोड यांनी शिंदे गटात प्रवेश करीत शिवसेनेशी बंडखोरी केली. संजय राठोडांचे बंड पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या फारच जिव्हारी लागल्याचे बोलले जात आहे. यातूनच संजय राठोडांना राजकीय धडा शिकविण्यासाठी सेना नेतृत्वाने आता पावले टाकायला सुरूवात केली आहे.





