औरंगजेबच्या कबरीचा मुद्दा संसदेत गाजला, शिवसेनेच्या खासदाराने थेट लोकसभेत केली कबर हटवण्याची मागणी

Naresh Mhaske | सध्या राज्यात मुघल सम्राट औरंगजेबची विविध कारणांमुळे चर्चा होत आहे. काही दिवसांपूर्वीच समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी औरंगजेबची प्रशंसा केल्याने वाद निर्माण झाला होता. याशिवाय, औरंगजेबची छत्रपती संभाजीनगर येथील खलिताबादमधील कबर हटवण्याची मागणी देखील केली जात आहे. आता शिवसेना (शिंदे गट) खासदार नरेश म्हस्के यांनी हा मुद्दा थेट संसदेत मांडला.
नरेश म्हस्के यांनी औरंगजेबाची कबर जमीनदोस्त करण्यात यावी अशी मागणी केली आहे. सभागृहाच्या शून्य प्रहरादरम्यान बोलताना म्हस्के यांनी हा मुद्दा उपस्थित केला.
लोकसभेत बोलताना नरेश म्हस्के म्हणाले की, ज्या औरंगजेबाने अत्यंत क्रूरपणे छत्रपती संभाजी महाराजांची हत्या केली, हिंदूंची मंदिरे पाडली. या मंदिरांमधील संपत्ती लुटली. तसेच शिखांच्या नवव्या व दहाव्या धर्मगुरूंची हत्या केली. त्याच औरंगजेबाची कबर खुलताबादमध्ये असून एएसआयने ती संरक्षित व संवर्धित केली आहे.
औरंगजेबाची कबर संरक्षित करण्याची गरज काय? असा सवाल करत त्यांनी औरंगजेबासह भारताविरोधात कामे केलेल्या सर्वांची स्मारके व कबरी नष्ट कराव्यात अशी मागणी केली आहे.
एएसआयने संरक्षित केलेल्या स्मारकांच्या यादीचा पुन्हा आढावा घ्यावा आणि फक्त तीच स्मारके संरक्षित केली पाहिजेत जी खरोखरच भारताच्या संस्कृतीचे, इतिहासाचे आणि स्वाभिमानाचे प्रतीक आहेत, असेही ते यावेळी बोलताना म्हणाले.
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील औरंगजेबाची कबर हटवण्यास तयार असल्याची भूमिका मांडली होती. प्रत्येकाला असच वाटतं की कबर हटवली पाहिजे. मात्र काही गोष्टी कायद्याने कराव्या लागतात. औरंगजेबच्या कबरीला जुन्या काँग्रेसच्या काळात एएसआयचं संरक्षण मिळालं होते, असे त्यावेळी बोलताना फडणवीस म्हणाले होते.





