शिवसेनेने घेतला ठाकरे टिकाकारांचा समाचार

करोनाची स्थिती प्रभावीपणे हाताळत असल्याचा केला दावा
मुंबई – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांचे सरकार राज्यातील करोनाची स्थिती अत्यंत प्रभावीपणे हाताळत आहेत, असे समर्थन शिवसेनेच्या मुखपत्रातील अग्रलेखात करण्यात आले असून मुख्यमंत्र्यांना अनुभव नसल्याने त्यांना ही स्थिती हाताळता येत नसल्याची भाजपच्या काही नेत्यांची टीका शिवसेनेने धुडकाऊन लावत त्यांनी ठाकरे विरोधकांचा जोरदार समाचार घेतला आहे.
भाजपच्या निरंजन डावखरे या नेत्याने ट्विटरवर उद्धव ठाकरे हे अनअनुभवी असल्याने त्यांना राज्यातील करोनाची स्थिती नीट हाताळता येत नसल्याची टीका केली होती. त्याऐवजी फडणवीस यांनी ही स्थिती प्रभावीपणे हाताळली असती असेही त्यांनी म्हटले होते. त्यावर ही स्थिती फडणवीसांनी कशी हाताळली असती असा सवाल शिवसेनेने केला असून करोनाच्या विषाणुंना त्यांनी गिळंकृत केले असते की त्याच्या मागेही त्यांनी सीबीआय किंवा ईडी लावली असती? असा खोचक सवालही शिवसेनेने केला आहे.
निरंजन डावखरे यांचा समाचार घेताना यात म्हटले आहे की, डावखरे यांनी गेल्याच वर्षी राष्ट्रवादी कॉंग्रेस सोडून भाजपची संगत धरली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस किंवा कॉंग्रेस मध्ये ज्यांनी आपले आयुष्य घातले त्यांनी अचानक भाजप मध्ये प्रवेश केला असून त्यांना असल्या प्रतिक्रीया देण्याचा अधिकार नाही असेही त्यांनी म्हटले आहे. ठाकरे सरकारने ईडी आणि सीबीआय तपासाच्या विषाणुचा जसा मुकाबला केला तितक्याच प्रभावी पद्धतीने हे सरकार करोनाच्या विषाणुचा प्रभावीपणे मुकाबला करीत आहे असे सेनेने म्हटले आहे.
राज्याचे सारे सरकार आणि त्यांचे मंत्रिमंडळ एकदिलाने करोनाचा मुकाबला करण्यासाठी अथक प्रयत्न करत असताना गेल्या वर्षी भाजप मध्ये गेलेल्या काही लोकांना ही स्थिती हाताळण्यासाठी फडणवीसांची आठवण येऊ लागली आहे, हे लोक अशा पद्धतीने करोनाचा प्रचार करीत असतील तर फडणवीसांची पातळी किती खाली गेली आहे हेच यातून दिसून येत असल्याची टिपण्णीही या मुखपत्रातील अग्रलेखात करण्यात आली आहे.
फडणवीसांनी अशा लोकांना बाजुला ठेवले पाहिजे अन्यथा त्यातून फडणवीस यांची जी काहीं थोडीफार इभ्रत किंवा विश्वासार्हता उरली आहे तीही रसातळाला गेल्या शिवाय राहणार नाही असे त्यांनी म्हटले आहे. भाजप आणि फडणवीस यांनी भीमाकोरेगाव दंगल प्रकरण कसे हाताळले, सांगलीची पूरस्थिती कशी हाताळली, आणि नोटबंदीनंतर बिघडलेल्या आर्थिक स्थितीचा त्यांनी कसा सामना केला हे साऱ्या देशाने पाहिले आहे असो टोमणाही त्यांनी भाजपला मारला आहे.
अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांच्या सारखे अनुभवी आणि शक्तीशाली नेते दिल्लीत कार्यरत असताना दिल्लीत सीएए वरून ज्या दंगली झाल्या आणि त्यांतून दिल्ली कशी पेटली तेही देशाने पाहिले आहे. ही सारी परिस्थिती पहाता महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी करोनाची स्थिती अत्यंत प्रभावीपणे हाताळली आहे असे शिवसेनेच्या मुखपत्राने म्हटले आहे.





