Shivsena Press Conference : शिवसेना भवनाबाहेर शिवसैनिकांची मोठी गर्दी

मुंबई – गेल्या काही दिवसांपासून शिवसेना आणि भाजपमध्ये राजकीय तणाव वाढत आहे. यादरम्यान आज संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेतली. या परिषदेला शिवसेनेचे महाराष्ट्रातील बडे नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने हजर होते.

शिवसेनेच्यावतीने दादर येथील शिवसेना भवनात पत्रकार परिषद सुरु आहे. शिवसेना परिषदेदरम्यान शिवसेना भवनाबाहेर शिवसैनिकांनी मोठी गर्दी केली आहे. शिवसेना भवन परिसरातील सुरक्षा व्यवस्था देखील वाढवण्यात आली असून सर्वेलन्स व्हॅन देखील सेना भवन परिसरात बघायला मिळत आहे. मुंबई आणि मुंबईबाहेरील शिवसैनिकांनी मोठ्या प्रमाणात शिवसेना भवनाबाहेर गर्दी केली आहे.

यावेळी खासदार संजय राऊत म्हणाले की, “केंद्रीय तपास यंत्राणांचा वापर करून महाराष्ट्रातील सरकार पाडण्याचा प्रयत्न करत आहेत. भाजपच्या अनेक नेत्यांनी आपल्याला सांगितले की तुम्ही काही लोकांनी आम्हाला मदत केली नाही तर केंद्रीय तपास यंत्रणांचा ससेमिरा तुमच्या मागे लावू. आम्ही शिवसेना प्रमुख बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली लढलो, नुसते हल्लेच नाहीत तर अतिरेक्यांचे हल्ले आम्ही परतवले आहेत ते याच वास्तूच्या खाली. आम्ही यांना घाबरणार नाही”, असे राऊत म्हणाले. तसेच यावेळी त्यांनी भाजप नेत्यांवर गंभीर आरोप केले.





