शिवसेनेच्या खासदारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सत्कार

नवी दिल्ली : ऑपरेशन सिंदूर आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांचा युनेस्कोच्या यादीत समावेश व्हावा यासाठी पुढाकार घेतल्याबद्दल शिवसेनेच्या खासदारांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले. यावेळी पंतप्रधानांना छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती भेट दिली आणि मराठा पगडी घालून सत्कार केला.
शिवसेनेचे गटनेते डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली खासदारांच्या शिष्टमंडळाने आज पंतप्रधानांची भेट घेतली. या शिष्टमंडळात आयुष खात्याचे मंत्री (स्वतंत्र प्रभार) प्रतापराव जाधव, खासदार नरेश म्हस्के, श्रीरंग बारणे, धैर्यशील माने, रविंद्र वायकर आणि मिलिंद देवरा यांचा समावेश होता. छत्रपती शिवाजी महाराज माझे सुध्दा आदर्श आहेत.
लोकसभेची निवडणूक लढलो आणि पंतप्रधान पदाच्या शर्यतीत आलो तेव्हा रायगडावर जाऊन महाराजांचे दर्शन घेतले होते, असे पंतप्रधानांनी शिष्टमंडळाला सांगितले.युनेस्कोच्या यादीत साल्हेर, शिवनेरी, लोहगड, खांदेरी, रायगड, राजगड, प्रतापगड, सुवर्णदुर्ग, पन्हाळा, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग तसेच तामिळनाडूतील जिंजी किल्ल्याचा समावेश झाला आहे. यासाठी पंतप्रधानांनी केलेल्या प्रयत्नांसाठी सेनेच्या खासदारांनी आभार व्यक्त केले.





