Shahajibapu Patil : …अन् शहाजी पाटलांनी भरसभेत आपल्याच थोबाडीत मारून घेतलं; नेमकं काय घडलं?

सोलापुर : सांगोला येथे सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांचा सर्वपक्षीय नेत्यांनी नागरी सत्कार कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी शेकापसे विद्यमान आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख, माजी आमदार शहाजी बापू पाटील, ठाकरे गटाकडून निवडणूक लढविलेले माजी आमदार दीपक आबा साळुंखे , शेकाप नेते बाळासाहेब एरंडे आणि तालुक्यातील बहुतांश विविध पक्षांचे नेते या सोहळ्यासाठी उपस्थित होते. यावेळी शिवसेना शिंदे गटातील माजी आमदार शहाजी पाटील यांनी भरसभेत तुफान भाष्य करत राजकीय वर्तुळात खळबळ उडवली आहे.
माजी आमदार शहाजी पाटील म्हणाले, ज्यांनी आजवर सांगोल्याचे पाणी आडवायचे काम केले त्याला तुम्ही खासदार म्हणून पाठवले आणि ज्यांनी सगळ्यात जास्त पाण्याची कामे केली त्याला घरी बसवले. आपल्याला काहीतरी वाटायला पाहिजे, ही जनतेची माणूस म्हणून मोठी चूक आहे, आपण या चुकीबद्दल तोंडात मारून घ्यायला पाहिजे. असे म्हणत भरसभेत शहाजीबापू पाटील यांनी स्वतःच्या तोंडात मारून घेतले.
शहाजी बापू पाटील म्हणाले, आजवर सांगोल्याच्या पाण्यासाठी सर्वात मोठे काम निंबाळकर यांनी करूनही त्यांना घरी बसवले. मात्र, ज्यांनी पाणी अडवले त्यांना खासदार केले, ही बाब आपल्याला काळजात चर्र करणारी वाटली पाहिजे. त्या बिचार्या निंबाळकरांनी आज तुमचा हारही घेतला नाही, असे सांगत लोकसभेचा पराभव नक्कीच जिव्हारी लागला आहे, असं शहाजी बापू पाटील म्हणाले.
जया भाऊ सांगतील त्या चिन्हावर मतदान करा, तुम्हाला आईची शपत
पुढे बोलताना म्हणाले, आता पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या नागरी सत्कारासाठी सर्वच नेते एकत्र स्टेजवर आले असताना आता तरी जया भाऊ सांगतील त्या चिन्हावर मतदान करावे लागेल, तुम्हाला आईची शपत आहे, असे आव्हान शहाजी बापू यांनी केले. स्वर्गीय गणपतराव देशमुख यांचे नातू आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांना सल्ला देताना म्हणाले, तुम्ही आमच्या पक्षात येऊ नका, मात्र तुमचा शेकाप हा महायुतीसोबत आणा असा सल्ला दिला.
पाण्यावरून अजित पवारांना टोला
सांगोला तालुक्यात येणाऱ्या उजनीतील पाणी प्रश्नाबाबत आपण यापूर्वीही बोललो आहोत. पाणी कुणी अडवले, कुणी घेतले, हे जाहीर सांगितलेले आहे. आता मात्र, जाहीर सांगणार नाही. कारण त्यांच्याकडे अर्थ खातं आहे, माझी अडचण कुणी करू नका, असे म्हणत आमदार शहाजी पाटील यांनी अजित पवारांचे नाव न घेता टोला लगावला.




