रत्नागिरी : आज नागपूरमध्ये फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार पार पडला. या मंत्रीमंडळात शिवसेना शिंदे गटाचे नेते दीपक केसरकर यांना मंत्रीमंडळातून डावलण्यात आले. शिंदे सरकारच्या काळात दीपक केसरकर हे शालेय शिक्षणमंत्री होते. आजच्या शपथविधीनंतर त्यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. काय म्हणाले दीपक केसरकर? माझी शिंदे साहेबांसोबत जबाबदारीबाबत कुठलीही चर्चा झालेली नाही. मी त्यांना एकदाच भेटलो होतो, तेव्हा खूप आमदरांची गर्दी होती. तेव्हा मलाच वाटलं आपल्या नेत्याला आपण किती त्रास द्यायचा. त्यानंतर मी त्यांना एकदाही भेटलो नाही. मंत्रीमंडळातून डावलने हा काय भाग नसतो. शिक्षण क्षेत्रात क्रांती करणारे निर्णय मी घेतले. मराठी भाषा विभाग हा दुर्लक्षित विभाग होता, त्याला मराठी भाषा धोरण दिलं. मी जे काही केलं त्यात मी समाधानी आहे. साईबाबा जे काही घडवतात ते चांगल्यासाठीच घडवतात. मी नसल्यामुळे त्या ठिकाणी फार फरक पडत नाही. आमच्या विभागातील पदाधिकाऱ्यांना भेटून मी अभिनंदन केलं आहे, असे दीपक केसरकर म्हणाले. एकनाथ शिंदे फायटर नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे एक फायटर नेते आहेत, परिस्थितीशी झुंज देत काम करण्याची क्षमता ते सिद्ध करत असतात. खरी शिवसेना कुणाची याचं योग्य उत्तर एकनाथ शिंदे यांनी जनतेकडून घेतलं आहे. एकनाथ शिंदे यांच्यात जे गुण आहेत ते एक शिवसैनिकाचे गुण आहेत. हे त्यांनी महाराष्ट्राला दाखवून दिले आहे असे दीपक केसरकर म्हणाले.