Thane : शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यावर हल्ला; 20 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल

ठाणे :- ठाणे जिल्ह्यात शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्याला काही जणांनी मारहाण केल्याचा प्रकार घडला असून या प्रकरणात 20 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रविवारी ही घटना घडली असे अंबरनाथ पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्याने सांगितले.
अंबरनाथ येथील नवरे पार्क शाखेचे शिवसेनेचे(शिंदे ग्रुप) शाखाप्रमुख अजित सुरेंद्रन नायर यांनी या प्रकरणात पोलिसांत तक्रार दिली आहे.
एका गृहनिर्माण संस्थेच्या पदाधिकाऱ्याची निवडणूक सुरू होती, त्यावेळी बाहेरचे काही जण तेथे आले आणि त्यांनी सोसायटी सदस्यांसाठी असलेल्या खुर्च्या ओढण्याचा प्रयत्न केला. तेव्हा नायर यांनी आक्षेप घेतल्यानंतर या सर्वांनी नायर यांना जबर मारहाण केली. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
हल्लेखोरांनी आपल्याला ठार मारण्याची धमकी दिली आहे असेही नायर यांनी पोलिस तक्रारीत म्हटले आहे. हल्लेखोरांपैकी पाच जणांची ओळख पटली असून त्यांचा शोध घेतला जात आहे.





