शिवसेना एक सुंदर स्त्री, त्यामुळे तिचे लचके तोडले जाणार; ‘या’ माजी आमदाराची जीभ घसरली

चिपळूण : चिपळूण संगमेश्वर मतदारसंघ शिवसेनेला न मिळाल्यामुळे माजी आमदार सदानंद चव्हाण हे नाराज आहेत. या नाराजीतून त्यांनी शिवसेनेची तुलना एका महिलेशी करत वादग्रस्त वक्तव्य केले. शिवसेना ही सुंदर स्त्री आहे. पण तिला कुणी मागे-पुढे राहिला नसल्यामुळे तिचे लचके तोडले जात आहेत, असे सदानंद चव्हाण म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
माजी आमदार सदानंद चव्हाण यांची शिवसेना शिंदे गटाकडून चिपळूण मतदारसंघातून निवडणूक लढण्याची इच्छा होती. त्यांनी पक्षाच्या कार्यकर्ता मेळाव्यात पक्ष निरीक्षकांसमोर उमेदवारी देण्याबाबत मागणी केली होती. यानंतर त्यांनी मुंबईत देखील पक्षनेत्यांच्या भेटी घेतल्या होत्या. परंतु, जागावाटपात चिपळूण मतदारसंघ भाजपला सुटल्याने सदानंद चव्हाण यांची निवडणूक लढवण्याची संधी हुकली. त्यामुळे ते नाराज आहेत.
नाराज सदानंद चव्हाण यांनी माध्यमांशी संवाद साधताना शिवसेनेची तुलना महिलेशी केली. शिवसेना ही एक सुंदर स्त्री आहे. आता तिची अशी परिस्थिती आहे की, तिला कोणीही मागे-पुढे राहिला नाही. त्यामुळे आता तिचे लचके तोडले जाणार. तिच्या गळ्यात आज लायसन्स आणि मंगळसूत्र नाही. पण ती सुंदर आहे. त्यामुळे शिवसेनेला कोणीही शिट्टया मारेल. तिला कोणी इकडे खेचेल, कुणी तिकडे खेचेल, असे सदानंद चव्हाण म्हणाले.
सदानंद चव्हाण पुढे म्हणाले, मतदारसंघात शिवसेनेची ताकद असतानाही उमेदवारी न मिळाल्याने नाराजी असणे साहजिकच आहे. माझी सुरुवातीपासून निवडणूक लढण्याची इच्छा होती. त्यानंतर पक्षाने गुहागरमधून उमेदवारी देण्याबाबत विचारणा केली. आपण त्यासाठीही तयारी दर्शवली होती. परंतु, महायुतीचा उमेदवार जाहीर झाल्याने त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार आहोत. त्यामध्ये शिवसेनेचा पदाधिकारी व कार्यकर्ता सर्व ताकदीनीशी उतरून निकम यांचा प्रचार करणार असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.





