Shiv Sena Hearing : शिवसेना पक्ष आणि चिन्ह वादावर सलग पाचव्या दिवशी सुनावणी; कपिल सिब्बल यांची आजही जोरदार बॅटिंग?
Shiv Sena Hearing : एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून उठाव केल्यानंतर पक्षात मोठी फूट पडली

Shiv Sena Hearing : शिवसेना पक्ष आणि ‘धनुष्यबाण’ चिन्ह प्रकरणाची सुनावणी अंतिम टप्प्यात येऊन पोहचली आहे. आज सलग पाचव्या दिवशी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडणार आहे. काल (12 ऑगस्ट) झालेल्या सुनावणीत ठाकरेंच्या शिवसेनेचे वकील कपिल सिब्बल यांनी निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर जोरदार टीका केली होती. त्यानंतर आज दुपारी २ वाजता पुन्हा सुनावणीला सुरुवात होणार आहे.
यावर सरन्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची आणि न्यायमूर्ती व्ही. मोहना यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी होत आहे. आज आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्द्यावर बाजू मांडत सिब्बल आपला युक्तिवाद पूर्ण करण्याची शक्यता आहे. त्यानुसार आज होणाऱ्या सुनावणीत नेमकं काय घडणार याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.
कपिल सिब्बल यांचा जोरदार युक्तिवाद
बुधवारी सुनावणीदरम्यान, उद्धव ठाकरे गटाची बाजू मांडताना ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी अत्यंत आक्रमक आणि कायदेशीरदृष्ट्या महत्त्वाचा युक्तिवाद केला. कपिल सिब्बल यांनी शिवसेनेच्या पक्षघटनेचा संदर्भ देत 1999 च्या घटनेमध्ये पक्षप्रमुखपदाबाबतची तरतूद आणि त्यानंतर झालेल्या संघटनात्मक बदलांवर प्रश्न उपस्थित केला.
निवडणूक आयोगाने आपल्या सोयीने निर्णय घेतला असून, पक्षातील संघटनात्मक बाबींचा विचार न करता निर्णय घेण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला. निवडणूक आयोगाने शिवसेनेच्या २०१८ मधील घटनेकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले, असा आरोप सिब्बल यांनी केला.
केवळ आमदारांच्या (विधिमंडळ पक्षाच्या) बहुमताच्या आधारे मूळ पक्षात फूट पडल्याचे गृहीत धरण्यात आले. संघटनात्मक रचनेत ठाकरे गट खूप पुढे असतानाही निवडणूक आयोगाने ही बाजू बाजूला ठेवून निर्णय दिला, असा युक्तिवादही त्यांनी मांडला.
सरळसरळ लोकशाहीची थट्टा
एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्रिपदी निवड बेकायदेशीर होती. जर कोणत्याही पक्षाचे आमदार बाहेर पडले, स्वतःलाच मूळ पक्ष घोषित करू लागले आणि सत्ताधारी पक्षासोबत जाऊन सरकार पाडू लागले, तर देशात कोणतीही लोकशाही शिल्लक राहणार नाही. ही सरळसरळ लोकशाहीची थट्टा आहे, असा युक्तिवाद सिब्बल यांनी केला.
दरम्यान, यावर आता सुप्रीम कोर्टाककडून मोठी टिप्पणी करण्यात आली आहे. तुम्ही ज्या संघटनात्मक गोष्टी मांडत आहात, त्या बरोबर वाटत आहेत. तसेच कोणताही निर्णय हा लोकशाही मार्गाने घेतला जावा, असंही या सुनावणीदरम्यान सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे.
‘निवडणूक आयोगाला व्हिलन ठरवलं जातयं’- नरेश म्हस्के
यावर माध्यमांशी बोलताना शिंदे पक्षाचे खासदार नरेश म्हस्के यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे. ‘निवडणूक आयोगाला व्हिलन ठरवलं जात आहे’, असं नरेश म्हस्के यांनी म्हटलं आहे.
नेमका वाद काय?
दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून उठाव केल्यानंतर पक्षात मोठी फूट पडली होती, पक्षाचे दोन गट पडले, एक शिवसेना शिंदे गट आणि दुसरा शिवसेना ठाकरे गट त्यानंतर शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्ह नेमकं कोणाचं असा प्रश्न निर्माण झाला.
यावर शिवसेना पक्षाचं चिन्ह आणि नाव शिवसेना शिंदे गटाला देण्याचा निर्णय निवडणूक आयोगाकडून घेण्यात आला. या विरोधात शिवसेना ठाकरे गटाकडून सुप्रीम कोर्टात धाव घेण्यात आली. या प्रकरणावर आज पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे.
हेही वाचा:







