मुंबई – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाने शिवसेना हा आपलाच विधिमंडळ पक्ष असल्याचा दावा केल्यानंतर शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावरून वाद निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सावध पवित्रा घेत निवडणूक आयोगाकडे कॅव्हेट दाखल करण्यात आले आहे.
राज्यातील सत्तेतून पायउतार होताच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेना भवनात बैठकांचा सपाटा लावला आहे. आठवडाभरापूर्वी त्यांनी सेना भवनात राज्यातील महिला पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. मी नव्याने सुरुवात करतोय. मी 19 जून 1966 च्या मानसिकतेत आहे. तेव्हा धनुष्यबाण देखील नव्हते, त्या मानसिकतेतून आपल्याला लढायचं आहे, असे त्यांनी म्हटले होते. तेव्हाच धनुष्यबाण आपल्या हातून निसटण्याची चिन्हे त्यांना दिसली होती.
मात्र, नंतर लगेचच पत्रकार परिषद घेऊन उद्धव ठाकरे यांनी, कायद्याच्या दृष्टीने बघितले आणि घटनेत जे काही नमूद केले आहे, त्यानुसार धनुष्यबाण शिवसेनेपासून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. त्यामुळे ती चिंता सोडा, असा ठाम विश्वास व्यक्त केला होता.
यानंतर उद्धव ठाकरे यांनी आपले धनुष्यबाण हे चिन्ह वाचविण्यासाठी निवडणूक आयोगाकडे कॅव्हेट दाखल केले आहे. आमची बाजू ऐकल्याशिवाय निर्णय घेऊ नका, अशी विनंती ठाकरे यांनी निवडणूक आयोगाला केली आहे.
दरम्यान, आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असतानाच उद्धव ठाकरे यांनी पक्षचिन्हासाठी निवडणूक आयोगाकडे धाव घेतली आहे.