BMC मधील शिवसेना कार्यालयाच्या रक्षणासाठी शिवसैनिक सरसावले; कार्यालयाबाहेर ठोकला तळ

मुंबई – एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटाकडून मुंबई महापालिकेतील शिवसेना कार्यालयाचा ताबा घेण्याचा कोणताही प्रयत्न प्रयत्न हाणून पाडण्यासाठी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील गटाच्या बाराहून अधिक माजी नगरसेवकांनी व त्यांच्या कार्यकर्त्यांनी महापालिका मुख्यालयातील शिवसेना कार्यालयाबाहेर तळ ठोकला आहे.
सोमवारी माजी नगरसेवक बीएमसी मुख्यालयाच्या तळमजल्यावर असलेल्या कार्यालयाबाहेर बसल्यानंतर, कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये म्हणून पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. विशेष म्हणजे, “आम्ही बाळासाहेब ठाकरेंच्या विचारसरणीचे वारसदार आहोत आणि आम्हाला कोणत्याही मालमत्तेचा लोभ नाही असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कालच स्पष्ट केले आहे.
हेरिटेज इमारत असलेल्या मुंबई महापालिका मुख्यालयाच्या तळमजल्यावर सर्व प्रमुख राजकीय पक्षांची कार्यालये आहेत. शिंदे गटाने कालच विधीमंडळातील शिवसेनेच्या पक्ष कार्यालयाचा ताबा घेतला आहे. आता त्यांच्याकडून शिवसेना भवनावरही दावा सांगितला जाऊ शकतो असे काहीं सूत्रांचे म्हणणे आहे.





