Shirur Unseasonal Rain : शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान! करडे गावात अवकाळीचा कहर; घरांचे पत्रे आणि पोल्ट्री फॉर्म जमीनदोस्त
Shirur Unseasonal Rain : शिरूर तालुक्यातील करडे गावात शुक्रवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार गारपिटीमुळे घरांचे छप्पर आणि पोल्ट्रीचे पत्रे उडून नागरिकांचे अतोनात नुकसान.

Shirur Unseasonal Rain – शिरूर तालुक्यातील करडे गाव परिसरात शुक्रवारी सायंकाळी झालेल्या अवकाळी पाऊस, वादळी वारे आणि गारपिटीने अक्षरशः थैमान घातले. गेल्या अनेक वर्षांत प्रथमच इतक्या तीव्र स्वरुपाचा नुकसानकारक पाऊस झाल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वादळी वाऱ्याच्या तडाख्यामुळे अनेक ठिकाणी विजेचे खांब कोसळले, घरांवरील पत्रे उडून गेली, झाडे उन्मळून पडली आहेत.
शेतकऱ्यांच्या सौर पॅनलचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. तसेच काही पोल्ट्रीवरचे पत्रे उडून गेले. शुक्रवार (दि 5) दुपारी अचानक आकाशात काळे ढग दाटून आले. काही क्षणांतच वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस व गारपीट सुरू झाली. सायंकाळपर्यंत हा पाऊस सुरु होता. वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यामुळे गावातील अनेक घरांचे छप्पर व पत्रे उडून गेली. काही ठिकाणी झाडे रस्त्यावर कोसळल्याने वाहतुकीलाही अडथळा निर्माण झाला होता.
करडे गावातील शेतकऱ्यांनी शेतात उभारलेले सौर पॅनल वादळी वाऱ्यामुळे जमीनदोस्त झाले. अनेक पॅनलचे काचेचे भाग फुटल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. महावितरण यंत्रणेलाही मोठा फटका बसला असून अनेक विजेचे खांब कोसळल्याने गावातील वीजपुरवठा खंडित झाला होता. गारपिटीमुळे शेतातील पिकांनाही फटका बसला आहे.
भाजीपाला, फळबागा आणि हंगामी पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी चिंतेत आहेत. नुकसानीचे प्रमाण अद्याप समोर आले नसले तरी महसूल व कृषी विभागाने तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, करडे गावात यापूर्वीही अवकाळी पाऊस झाला होता; मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणात गारपीट,
वादळी वारे आणि मालमत्तेचे नुकसान झाल्याची घटना अनेक वर्षांत प्रथमच घडली आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये नैसर्गिक आपत्तीबाबत तीव्र चिंता व्यक्त होत आहे. दरम्यान, प्रशासनाने तातडीने नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून वीजपुरवठा सुरळीत करण्याचे काम हाती घेतले असून नुकसानग्रस्त शेतकरी व नागरिकांना शासनाकडून योग्य भरपाई मिळावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अमोल घायतडक यांनी केली आहे.





