अवैध गुंठेवारीमुळे शिरूर तालुक्यावर पाणीटंचाईचे संकट!

रांजणगाव गणपती : शिरूर तालुक्यात अवैध गुंठेवारीमुळे भूगर्भातील पाण्याची पातळी खालावत असून, भविष्यात भीषण पाणीटंचाई आणि दुष्काळाचे संकट उद्भवण्याची भीती नागरिकांकडून वर्तवली जात आहे. पुणे-नगर महामार्गालगत आणि इतर भागांत बेकायदा गुंठेवारीमुळे उभ्या राहिलेल्या इमारतींसाठी प्रत्येक गुंठ्यावर कुपनलिका खणल्या जात आहेत. एका एकरात 30-35 इमारतींसाठी तितक्याच कुपनलिकांद्वारे रोज लाखो लिटर पाणी उपसले जात आहे. या कुपनलिकांची सातबारा किंवा सरकारी दप्तरात नोंद नसल्याने पाण्याचा बेसुमार अपव्यय होत असल्याचे म्हटले जात आहे.
पुणे जिल्ह्यातील भूजल पातळीत घट; शिरूरमध्ये पाणीपातळी सर्वाधिक खोल
शेतकऱ्यांना शेतीसाठी विहीर किंवा कुपनलिका घेण्यासाठी तलाठी आणि मंडल अधिकाऱ्यांच्या कार्यालयात खेटे घालावे लागतात. एक-दोन एकर शेतीसाठी एक कुपनलिका पुरेशी असताना, अवैध गुंठेवारीमुळे एका एकरात 30-35 कुपनलिकांमुळे भूगर्भातील पाण्याची पातळी झपाट्याने खालावत आहे. यामुळे लगतच्या शेतकऱ्यांच्या विहिरी आणि कुपनलिकांमधील पाणी कमी होऊन शेती आणि दूध व्यवसायावर परिणाम होत आहे.
प्रशासन आणि ग्रामपंचायतींकडून पाण्याची पातळी वाढवण्यासाठी कोणतीही उपाययोजना होत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. लाखो एकर बागायती क्षेत्र पाण्याअभावी ओस पडण्याची भीती आहे. शेतकऱ्यांनी अवैध कुपनलिकांवर बंदी घालण्याची आणि प्रशासनाने त्वरित तोडगा काढण्याची मागणी लावून धरली आहे. प्रशासनाने ठोस पावले न उचलल्यास शिरूर तालुक्याला दुष्काळाला सामोरे जावे लागेल असा अंदाज वर्तवला जात आहे.





