Shirur : बेट भागातील गुन्हेगारी, अवैध धंदे आणि पाणीटंचाईवर तातडीने उपाययोजना करा; आमदार दिलीप वळसे पाटील यांचे प्रशासनाला निर्देश
Shirur : बैठकीत विविध विभागांच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेण्यात आला असून कायदा-सुव्यवस्था, पाणीटंचाई, वीजपुरवठा, शेती आणि विकासकामांबाबत महत्त्वपूर्ण सूचना व निर्णय घेण्यात आले.

Shirur : बेट भागातील वाढती गुन्हेगारी, अवैध धंदे, पानटपऱ्यांवर विकल्या जाणाऱ्या नशेच्या पदार्थांची विक्री, विद्युत रोहित्र चोरी तसेच तालुक्यात निर्माण झालेल्या पाणीटंचाईच्या गंभीर प्रश्नांवर तातडीने आणि प्रभावी उपाययोजना राबविण्याचे निर्देश आमदार दिलीप वळसे पाटील यांनी प्रशासनाला दिले.
शिरूर पंचायत समिती येथे आयोजित तालुका समन्वय समिती तसेच मुख्यमंत्री बळीराजा शेत/पानंद रस्ता योजना समितीच्या बैठकीत ते बोलत होते. बैठकीत कायदा-सुव्यवस्था, पाणीटंचाई, वीजपुरवठा, शेती आणि विकासकामांचा आढावा घेण्यात आला.
बेट भागात सुरू असलेले दारू, जुगार, मटका यांसारखे अवैध व्यवसाय तसेच पानटपऱ्यांवरून विकल्या जाणाऱ्या नशिले पान व अन्य मादक पदार्थांच्या विक्रीवर तातडीने कारवाई करून हे प्रकार पूर्णपणे बंद करण्याचे निर्देश त्यांनी शिरूर पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांना दिले. गुन्हेगारी प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी पोलिसांनी विशेष मोहीम राबवावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी अनेक ठिकाणी बेकायदेशीररीत्या वीजेचे आकडे टाकून वीज वापर होत असल्याने वारंवार विद्युत रोहित्र जळत असल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. या प्रकारांवर नियंत्रण मिळविण्यासाठी महावितरणने विशेष मोहीम हाती घेऊन दोषींवर कठोर कारवाई करावी, असे निर्देश वळसे पाटील यांनी दिले. तसेच तालुक्यात वाढलेल्या विद्युत रोहित्र चोरीच्या घटनांचा गांभीर्याने तपास करून संबंधित आरोपींना तातडीने अटक करण्याच्या सूचना त्यांनी पोलीस प्रशासनाला दिल्या.
तालुक्यातील अनेक भागांमध्ये नदीपात्रे कोरडी पडल्याने पाणीटंचाईचे संकट तीव्र होत असल्याची चिंता व्यक्त करत त्यांनी उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांनी तातडीने पाणीटंचाईग्रस्त गावांचे सर्वेक्षण करून टँकर मंजुरीची प्रक्रिया सुरू करावी, असे निर्देश दिले. नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावे लागू नये, यासाठी प्रशासनाने आवश्यक त्या सर्व उपाययोजना युद्धपातळीवर राबवाव्यात, असेही त्यांनी सांगितले.
बैठकीस आमदार माऊली कटके, माजी आमदार पोपटराव गावडे, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत ढोले, उपविभागीय अधिकारी विठ्ठल जोशी, तहसीलदार शिरूरबाळासाहेब म्हस्के,गटविकास अधिकारी महेश डोके, उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय अमोल भोसले, मुख्याधिकारी नगर परिषद, तालुका कृषी अधिकारी, शिरूर पोलीस निरीक्षक विनोद पाटील (शिरूर), रांजणगाव व शिक्रापूर पोलीस ठाण्यांचे अधिकारी, वन परिक्षेत्र अधिकारी, मृद व जलसंधारण विभागाचे अधिकारी, उपकार्यकारी अभियंता महावितरण शिरूर व शिक्रापूर, कार्यकारी अभियंता महावितरण केडगाव,
तालुका आरोग्य अधिकारी, पंचायत समिती शिरूर, जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे उपअभियंता, घोड पाटबंधारे उपविभागाचे अधिकारी, महिला व बालविकास अधिकारी, तालुका पशुवैद्यकीय अधिकारी, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, पाबळ, न्हावरा, शिक्रापूर, शिरूर व मलठण ग्रामीण रुग्णालयांचे वैद्यकीय अधीक्षक, कवठे येमाई प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी, उपविभागीय जलसंधारण अधिकारी, दुय्यम निबंधक, सहायक निबंधक, डींभे धरण उपविभागाचे अधिकारी, नायब तहसीलदार, पुरवठा निरीक्षण अधिकारी, सर्व मंडळ अधिकारी तसेच महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत विविध विभागांच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेण्यात आला असून कायदा-सुव्यवस्था, पाणीटंचाई, वीजपुरवठा, शेती आणि विकासकामांबाबत महत्त्वपूर्ण सूचना व निर्णय घेण्यात आले.





