शिरूर: काळूबाईनगर शाळेत विद्यार्थ्यांनी सादर केला सांस्कृतिक ठेवा

शिरूर – तालुक्यातील कवठे केंद्रातील काळूबाईनगर ही फक्त 34 विद्यार्थी असलेली छोटी शाळा. छोट्या शाळेत मुलांचा विकास खुंटतो, हा समज खोटा ठरवत या शाळेने आपली वेगळी ओळख निर्माण केली. वार्षिक स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांनी साडेतीन तास पालक आणि प्रेक्षकांना खिळवून ठेवलं.
शिवराज्याभिषेक सोहळा, प्रतीकात्मक विवाह, बळीराजाची व्यथा, महाराष्ट्राची लोकधारा दाखवणारी लावणी, लोकगीते आणि विठुरायाचा गजर अशा सादरीकरणांनी प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. कधी हसवणारे, कधी रडवणारे भावनिक प्रसंग पाहताना टाळ्यांचा कडकडाट आणि बक्षिसांचा वर्षाव झाला. बैलगाडा शर्यतीने पुणे जिल्ह्याची शान उजळली.
कार्यक्रमाचं उद्घाटन सावित्रा थोरात यांनी केलं. बाळासाहेब डांगे, वसंतशेठ पडवळ, मनीषाताई नरवडे, रवींद्र पडवळ, शरद निंबाळकर, अविनाश चव्हाण यांच्यासह अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून मुलांच्या कलेला दाद दिली.
शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संभाजी इचके, उपाध्यक्षा शामल इचके, मुख्याध्यापक बाबाजी मेचे यांनी नियोजन केलं. सूत्रसंचालन कैलास पडवळ आणि निलेश पडवळ यांनी, तर आभार प्रकाश इचके यांनी मानले. या छोट्या शाळेने मोठी कामगिरी करून सर्वांचं लक्ष वेधलं.





