Shirur Police : शिरूर पोलीस ठाण्याच्या निरीक्षकपदी विनोद पाटील यांची नियुक्ती
Shirur Police : संदेश केंजळे यांची आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागात बदली

Shirur Police : शिरूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांची पुणे येथील आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागात बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पाटील यांनी नुकताच पदभार स्वीकारला असून त्यांच्या नियुक्तीमुळे शिरूर पोलीस ठाण्याला नव्या नेतृत्वाची साथ मिळाली आहे.
पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांनी सुमारे दोन वर्षांपूर्वी शिरूर पोलीस ठाण्याची धुरा सांभाळली होती. त्यांच्या कार्यकाळात तालुक्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याबरोबरच अनेक संवेदनशील प्रकरणांचा तपास प्रभावीपणे करण्यात आला. तसेच जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिका निवडणुका शांततापूर्ण वातावरणात पार पाडण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका राहिली.
सामाजिक, धार्मिक आणि राजकीय कार्यक्रमांदरम्यान कायदा-सुव्यवस्थेचे नियोजन, गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी विशेष मोहिमा, अवैध धंद्यांविरोधातील कारवाया, वाहतूक व्यवस्थापन आणि नागरिकांशी संवाद वाढविण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात केंजळे यांनी पुढाकार घेतला होता. त्यांच्या बदलीनंतर आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागात त्यांच्यावर नवी जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
नवनियुक्त पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांनी यापूर्वी मुंबई येथे तब्बल २८ वर्षे विविध महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे. गुन्हे तपासाचा प्रदीर्घ अनुभव, प्रशासकीय कामकाजातील कौशल्य आणि कायदा-सुव्यवस्था राखण्यातील कार्यक्षमतेमुळे त्यांची ओळख आहे. वेगाने विकसित होत असलेल्या शिरूर तालुक्यातील पोलीस प्रशासनाची जबाबदारी सांभाळताना त्यांच्या अनुभवाचा लाभ होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
शिरूर पोलीस ठाण्यासमोरील वाढती आव्हाने –
दरम्यान, शिरूर शहर व तालुक्यातील नागरिक, सामाजिक संघटना आणि विविध क्षेत्रांतील व्यक्तींनी विनोद पाटील यांचे स्वागत केले आहे. वाढती लोकसंख्या, वाढती गुन्हेगारी, तसेच पुणे-अहमदनगर महामार्गावरील वाढता वाहतुकीचा ताण लक्षात घेता शिरूर पोलीस ठाण्यासमोरील आव्हानेही वाढली आहेत. नव्या नेतृत्वाकडून गुन्हेगारीवर अधिक प्रभावी नियंत्रण, वाहतूक व्यवस्थापनात सुधारणा आणि नागरिकांना त्वरित न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न होतील, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.





