शिरूर पोलिसांची धडाकेबाज कारवाई ! तीन गावठी पिस्तुले, दहा जिवंत काडतुसे आणि अॅक्टीव्हा जप्त

शिरूर : शिरूर तालुक्यातील आमदाबाद फाटा येथे काळ्या रंगाच्या विनानंबर अॅक्टीव्हा गाडीवर थांबलेल्या दोन संशयित युवकांकडून शिरूर पोलिसांच्या डी.बी. पथकाने तीन गावठी पिस्तुले, दहा जिवंत काडतुसे आणि एक अॅक्टीव्हा असा एकूण १ लाख १५ हजारांचा ऐवज जप्त करून आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.
दिनांक २९ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७.४५ वाजता पोलीस कॉन्स्टेबल विजय शिंदे यांना गुप्त बातमीदारामार्फत कळाले की, आमदाबाद फाटा परिसरात दोन इसम कमरेला पिस्तुल लावून अॅक्टीव्हा गाडीवर थांबलेले आहेत. ही माहिती तात्काळ पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण यांनी पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांना कळवली. त्यानंतर डी.बी. पथकाने पंचासह आमदाबाद फाट्याजवळ सापळा रचून संशयितांना गाठले.
पोलिसांनी शिताफीने केलेल्या कारवाईत…
1. समीर उर्फ नवाब वजीर शेख (वय २०, रा. शिरटे, ता. वळवा, जि. सांगली),2. दिपक शिवलींग वांगणे (वय २०, रा. अमरदीप सोसायटी, कारेगाव, ता. शिरूर) या दोघांना ताब्यात घेऊन दोन गावठी पिस्तुले, चार जिवंत काडतुसे आणि विनानंबर अॅक्टीव्हा जप्त करण्यात आली.
गुन्हा नोंदीनंतर पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण तपास करत असताना आरोपी दिपक वांगणे याच्याकडून आणखी एक गावठी पिस्तुल आणि सहा जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. यामुळे ३ गावठी पिस्तुले,१० जिवंत काडतुसे, अॅक्टीव्हा मोटारसायकलअसा एकुण किंमत सुमारे १,१५,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या गुन्ह्याबाबत पोलीस कॉन्स्टेबल सचिन भोई यांनी शिरूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, आरोपींवर भारतीय हत्यार कायदा कलम ३, २५ तसेच भारतीय न्याय संहिता कलम ३ (५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना १ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी रिमांड देण्यात आली आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक शसंदीप गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले व मा. पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण, पो.ह. अक्षय कळमकर, पो.अंमलदार विजय शिंदे, नितेश थोरात, निरज पिसाळ, सचिन भोई, निखील रावडे, रविंद्र काळे, अजय पाटील, रविंद्र आव्हाड आदींचा सहभाग होता





