Shirur Police : शिरूर पोलिसांची धडाकेबाज कारवाई ! गहाळ झालेले 35 मोबाईल शोधून मूळ मालकांना केले परत

शिरूर : शिरूर पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने एक मोठी आणि उल्लेखनीय कामगिरी करत तब्बल ३५ गहाळ मोबाईल फोन शोधून काढत ते त्यांच्या मूळ मालकांच्या ताब्यात दिले आहेत. हे सर्व मोबाईल्स परराज्य व परजिल्ह्यांमधून शोधून काढण्यात आले असून त्यांची एकूण अंदाजे किंमत सुमारे ६ लाख ८६ हजार रुपये इतकी आहे.
सन २०२४ ते एप्रिल २०२५ दरम्यान शिरूर शहरातील बाजारपेठ, बस स्थानक आणि इतर परिसरातून मोबाईल हरवलेबाबत अनेक तक्रारी पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाल्या होत्या. या तक्रारींचे गांभीर्य ओळखून पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांनी विशेष तपास पथकाला मोबाईल शोधण्याचे आदेश दिले. त्यानुसार, पोलीस कॉन्स्टेबल विजय गजानन शिंदे यांनी सुसज्ज तांत्रिक विश्लेषणाची मदत घेत हरवलेले मोबाईल ट्रॅक करण्याचे काम सुरू केले. या परिश्रमातून तब्बल ३५ मोबाईल्स यशस्वीरीत्या शोधण्यात आले.
दिनांक २१ एप्रिल २०२५ रोजी, पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या हस्ते हे मोबाईल फोन मूळ मालकांच्या ताब्यात देण्यात आले. अनेक नागरिकांनी गहाळ मोबाईल परत मिळणार नाही असे मानले होते, मात्र पुन्हा आपला मोबाईल परत मिळाल्याने त्यांनी शिरूर पोलीस स्टेशनच्या कामगिरीचे भरभरून कौतुक केले आणि मनापासून आभार व्यक्त केले.
ही उल्लेखनीय कामगिरी पोलीस अधीक्षक पंकज देशमुख,अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले, तसेच पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. तपास पथकात पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण व पोलीस अमंलदार विजय शिंदे यांचा मोलाचा सहभाग होता. शिरूर पोलिसांची ही कामगिरी नागरिकांमध्ये विश्वास वाढवणारी ठरली असून, पोलिसांबद्दलचा सकारात्मक दृष्टिकोन अधिक बळकट करणारी आहे.





