Shirur : शिरूर बाजार समितीत पक्षीय नाराजीचा स्फोट!
Shirur : महायुती-महाविकास आघाडीतील बंडखोरीने निवडणूक चुरशीची; "पैसा की जनमत?" याची लागणार कसोटी

Shirur : शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत यंदा विचारधारेपेक्षा राजकीय गणिते, पक्षनिष्ठेपेक्षा वैयक्तिक समीकरणे आणि कार्यकर्त्यांपेक्षा पैशाला प्राधान्य दिल्याच्या चर्चेमुळे वातावरण चांगलेच तापले आहे.
महायुतीच्या शेतकरी विकास पॅनलमध्ये भाजप, राष्ट्रवादी (अजित पवार गट) आणि शिवसेना ( शिंदे गट )एकत्र आल्याने अनेक इच्छुकांना उमेदवारीपासून वंचित राहावे लागले. परिणामी तिन्ही पक्षांत नाराजीचा भडका उडाला असून त्याचा थेट परिणाम निवडणुकीवर होणार असल्याचे चित्र आहे.
भाजपमध्ये अनेक जुने कार्यकर्ते आणि पदाधिकारी उमेदवारी न मिळाल्याने अस्वस्थ आहेत. राष्ट्रवादीतही अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. जिल्हा परिषद निवडणुकीत ( अजित पवार गट ) राष्ट्रवादीत गेलेले दामूअण्णा घोडे यांना अपेक्षित यश मिळाले नाही.
त्यानंतर अजित पवार गटाकडून बाजार समिती निवडणुकीत त्यांच्या समर्थकांना संधी न मिळाल्याने त्यांनी पुन्हा अशोक बापू पवार ( शरदचंद्र पवार गट )यांच्यासोबत हातमिळवणी करत स्वाभीमानी शेतकरी विकास पॅनल स्थापन करत आपल्या कार्यकर्त्यांना उमेदवारी मिळवून दिली आहे.
तालुक्यात नेमकं चाललंय तरी काय?
दुसरीकडे, जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपमध्ये प्रवेश करून विजयी झालेले राजेंद्र गावडे आणि माजी आमदार पोपटराव गावडे यांचे नाव पुन्हा चर्चेत आले आहे. वळसे पाटील यांच्याशी फारकत घेऊन मतभेद झाल्याच्या चर्चा रंगत असतानाच दोन्ही पिता -पुत्र विविध कामांसाठी अजूनही वळसे पाटील यांच्या संपर्कात असल्याने तालुक्यात “नेमकं चाललंय तरी काय?” असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
गेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीतील राजकीय घडामोडींनंतर आमदार माऊली कटके यांच्याशी मतभेद झाल्याने राहुल पाचर्णे नाराज असल्याचे बोलले जात होते. आता दामूअण्णा घोडे, अशोक बापू पवार आणि दिगंवत माजी आमदार बाबुराव पाचर्णे यांचे सुपुत्र राहुल पाचर्णे हे तिघे एकत्र येत महायुतीला थेट आव्हान देणारे स्वतंत्र समीकरण उभे करत निवडणुकीच्या रणांगणात उतरले आहेत. त्यामुळे ही लढत अत्यंत अटीतटीची होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
पुर्व – पश्चिम भागातील कार्यकर्ते आणि मतदारांमध्ये नाराजी –
दरम्यान, महायुतीने उमेदवारी देताना आर्थिकदृष्ट्या सक्षम उमेदवारांना अधिक प्राधान्य दिल्याची चर्चा गावागावात रंगली आहे. विशेषतः कारेगाव-रांजणगाव परिसरातील उमेदवारांना अधिक संधी मिळाल्याने तालुक्यातील पुर्व – पश्चिम भागातील कार्यकर्ते आणि मतदारांमध्ये नाराजी असल्याचे दिसून येत आहे.
छोट्या गावांतील कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष झाल्याचा सूरही उमटत आहे. त्यात आता महायुतीच्या शेतकरी विकास पॅनलच्या बाजूने माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनीही कंबर कसत बाजार समितीच्या निवडणुकीच्या प्रचार दौर्यात ते सामील झाले आहे. त्यामुळे ही निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची बनलेली आहे.
या सर्व घडामोडींमुळे या निवडणुकीत “पैशाची ताकद जिंकणार की मतदारांचा कौल?” याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे. पक्षीय निष्ठा, विचारधारा आणि जुने कार्यकर्ते बाजूला पडत असल्याची भावना तळागाळात निर्माण झाली असून त्याचा फटका कोणाला बसतो, हे निकालानंतर स्पष्ट होणार आहे.
याच पार्श्वभूमीवर पुढील वर्षभरात शिरूर तालुक्याच्या प्रशासकीय पुनर्रचनेचीही जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
आंबेगाव तसेच हवेली तालुक्याला जोडलेली काही गावे पुन्हा शिरूर तालुक्यात समाविष्ट होण्याची शक्यता असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळत आहे. भविष्यातील या बदलांचा राजकीय समीकरणांवर मोठा परिणाम होऊ शकतो. त्यामुळेच माजी आमदार अशोक बापू पवार यांनी आतापासूनच मैदानात उतरून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी रणनीती आखण्यास सुरुवात केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात चांगलीच रंगत आहे.





