शिरूर: टाकळी हाजी आरोग्य केंद्रावरील बेजबाबदार डॉक्टरांविरोधात नऊ गावांचा संताप; बदलीसाठी आक्रमक पवित्रा

शिरूर- शिरूर तालुक्यातील टाकळी हाजी प्राथमिक आरोग्य केंद्र हे नावापुरतेच ‘आरोग्य’ केंद्र राहिले असून, रुग्णांसाठी ते मृत्यूचे सापळा बनले आहे. येथील वैद्यकीय अधिकारी सरकारी निवासस्थानी न राहता बाहेर मौजमजा करत असल्याचा गंभीर आरोप आहे. सकाळी काही तास हजेरी लावून दुपारी केंद्र सोडून निघून जाणाऱ्या या अधिकाऱ्यांमुळे १२ गावे आणि ४ उपकेंद्रांतील हजारो रुग्णांना वेळेवर उपचार मिळत नाहीत.
परिणामी, रुग्णांना जीवघेणा त्रास सहन करावा लागत आहे. याविरोधात टाकळी हाजी, फाकटे, चांडोह, पिंपरखेड, काठापूर, माळवाडी, शरदवाडी, वडनेर, जांबूत या नऊ ग्रामपंचायतींनी एकत्र येत पुणे जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना लेखी निवेदन सादर केले आहे.
“खासगी रुग्णालयात धाव घ्यावी लागते”
“सरकारी डॉक्टर अनुपस्थित असल्याने आम्हाला खासगी रुग्णालयात जावे लागते. यामुळे वेळ, पैसा आणि जीव तिन्ही धोक्यात येतात,” असा संताप ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे. विशेष म्हणजे, या आरोग्य केंद्रावर तक्रार वही किंवा हालचाल रजिस्टरच उपलब्ध नाही. “जबाबदारी झटकून फक्त पगार घेणारे हे अधिकारी रुग्णांच्या जीवाशी खेळत आहेत,” असा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, एका डॉक्टरचे वडील मोठे अधिकारी असल्याने वरिष्ठांवर दबाव येत असल्याची चर्चा आहे. यामुळे त्यांची बदली होत नाही, अशी खात्रीलायक माहिती समोर आली आहे.
“बदली नाही तर उपोषण”
“अशा बेजबाबदार अधिकाऱ्यांची तात्काळ बदली झालीच पाहिजे. अन्यथा, आम्ही त्यांना आरोग्य केंद्रात प्रवेश नाकारू आणि गरज पडल्यास रस्त्यावर उतरून उग्र आंदोलन करू,” असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. बारा गावांच्या ग्रामपंचायतींनी याविरोधात एकमुखाने लेखी निवेदने दिली असून, “दहा दिवसांत बदली न झाल्यास उपोषण करू,” अशी आक्रमक भूमिका पदाधिकाऱ्यांनी घेतली आहे.
“मृत्यूच्या दाराशी ढकलले जात आहे”
“शिरूरमध्ये सरकारी डॉक्टर सुखासीन आयुष्य जगतात, तर टाकळी हाजीतील नागरिक मृत्यूच्या दाराशी ढकलले जात आहेत. हे आम्हाला मान्य नाही,” असा संतप्त स्वर परिसरात घुमत आहे. आता या प्रकरणी वरिष्ठ अधिकारी बेजबाबदार अधिकाऱ्यांवर कोणती कारवाई करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.





