जांबुत : शिरूर तालुक्याच्या पश्चिम बेट भागात वाढत्या चोऱ्यांमुळे नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे. शुक्रवारी (दि. १५ ऑगस्ट) पहाटे पिंपरखेड (ता. शिरूर) येथील गावठाण परिसरातील दत्तकृपा हॉटेलचे शटर उचकटून अज्ञात चोरट्यांनी चोरी केल्याची घटना घडली. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, चोरट्यांना पकडण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे. पिंपरखेड येथील विठ्ठल सावळेराम ढोमे आणि त्यांची सून सुषमा ढोमे दत्तकृपा हॉटेल चालवतात. नेहमीप्रमाणे रात्री हॉटेल बंद करून कुटुंबीय झोपण्यासाठी गेले असता, पहाटे अज्ञात चोरट्यांनी शटर उचकटून रोख रक्कम आणि हॉटेलसाठी वापरले जाणारे पेट्रोल चोरून पलायन केले. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये नोंदवली गेली आहे. ग्रामस्थांनी पोलिसांनी या फुटेजच्या आधारे चोरट्यांचा शोध घेऊन त्यांना अटक करावी, अशी मागणी केली आहे. यापूर्वीही या भागात वाहनचोरी, कृषीपंप चोरी, आणि केबल चोरीच्या घटनांनी नागरिकांचे धाबे दणाणले आहे. अनेक गुन्ह्यांचा तपास अद्याप प्रलंबित आहे. रात्रीच्या वेळी विनानंबरप्लेटच्या दुचाकी आणि चारचाकी वाहनांचा संचार नागरिकांच्या नजरेस पडत असल्याने भीतीचे वातावरण आहे. परिसरातील वस्त्यांवर रात्रीच्या वेळी पोलिस गस्त वाढवावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. शिरूर पोलीस उपनिरीक्षक दिलीप पवार यांनी सांगितले की, पोलिस प्रशासन या भागातील चोऱ्या रोखण्यासाठी सतत प्रयत्न करत आहे. यापूर्वीच्या चोरी प्रकरणांचा तपास सुरू असून, लवकरच सर्व गुन्ह्यांतील आरोपींना जेरबंद केले जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.