Shirur News : शिरूर शहरात महावितरणतर्फे काढण्यात आलेल्या विद्युत सुरक्षा जनजागृती रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद

शिरूर : विद्युत सुरक्षा सप्ताहानिमित्त महावितरणच्या शिरूर उपविभागातर्फे “शून्य अपघात हेच आमचे ध्येय” या ब्रीदवाक्याला अनुसरून शिरूर शहरात भव्य बाइक रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीद्वारे नागरिकांमध्ये विद्युत सुरक्षेबाबत जनजागृती करण्याचा महत्त्वपूर्ण प्रयत्न झाला.
शहरातील मुख्य मार्गांवरून काढलेल्या या मोटरसायकल मिरवणुकीत महावितरणचे अधिकारी, कर्मचारी आणि स्वयंसेवक सहभागी झाले. विद्युत सुरक्षेच्या सूचना देणारे फलक, बॅनर्स आणि घोषवाक्यांद्वारे नागरिकांचे लक्ष वेधले गेले. सुरक्षित वीज वापर, ऊर्जा संवर्धन, पर्यावरणपूरक जीवनशैली आणि अनधिकृत तसेच असुरक्षित वीज जोडण्यांमुळे होणारे धोके याबाबत प्रभावी संदेश देण्यात आले.
महावितरण शिरूर उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता सुमित जाधव म्हणाले, “विद्युत सुरक्षा ही केवळ महावितरणचीच नव्हे, तर प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी आहे. शून्य अपघाताचे उद्दिष्ट हे केवळ घोषणा नसून, आमचा सातत्यपूर्ण प्रयत्न आहे.”या रॅलीत महावितरणचे अधिकारी, तांत्रिक कर्मचारी, ठेकेदार कर्मचारी, सामाजिक कार्यकर्ते आणि ग्राहक मोठ्या संख्येने सहभागी झाले. शहरवासीयांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेत या उपक्रमाचे स्वागत केले. अनेक ठिकाणी नागरिकांनी रस्त्यावर थांबून फलकांवरील संदेश वाचत आपली जागरूकता दर्शवली.
विद्युत सुरक्षा सप्ताहाच्या निमित्ताने महावितरणने सुरक्षित, विश्वासार्ह आणि गुणवत्तापूर्ण वीज सेवा देण्याचा संकल्प पुन्हा अधोरेखित केला. तांत्रिक बिघाडांवर तात्काळ उपाय, ग्राहकांच्या समस्यांचे त्वरित निराकरण आणि वीज पुरवठा सुरळीत ठेवण्यावर विशेष भर दिला जात असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. शून्य अपघात, ऊर्जा संवर्धन, पर्यावरणपूरक जीवनशैली आणि ग्राहककेंद्रित सेवेचा संदेश या अभियानातून प्रभावीपणे पोहोचवला गेला.





