शिक्रापूर : शिक्रापूर येथील मलठण फाटा परिसरात एका अतिविषारी घोणस सापाने सर्पमित्राच्या गाडीत 27 पिल्लांना जन्म दिल्याची आश्चर्यकारक घटना घडली. या सापाला आणि त्याच्या पिल्लांना वनविभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत निसर्गात मुक्त करण्यात आले. मलठण फाटा येथील वाघेश्वर डेअरीजवळ पावसाळी वातावरणात एक मोठा साप दिसल्याची माहिती निसर्ग वन्यजीव सामाजिक संस्थेचे अध्यक्ष शेरखान शेख यांना मिळाली. त्यांनी तातडीने घटनास्थळी जाऊन पाहणी केली आणि अतिविषारी घोणस सापाला बरणीत पकडून गाडीत ठेवले. दुसऱ्या दिवशी सकाळी सापाला निसर्गात सोडण्यासाठी बरणी तपासली असता, त्याने २७ पिल्लांना जन्म दिल्याचे आढळले. याबाबत शिरूर विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी निळकंठ गव्हाणे यांना माहिती देण्यात आली. त्यानंतर नियतक्षेत्र अधिकारी प्रमोद पाटील यांच्या उपस्थितीत शेरखान शेख, नेचरगार्ड ऑर्गनायझेशनचे अध्यक्ष गणेश टिळेकर, सचिव शुभांगी टिळेकर, अमोल कुसाळकर आणि आयान शेख यांनी साप आणि त्याच्या सर्व पिल्लांना सुरक्षितपणे निसर्गात मुक्त केले.