Shirur News : शरदवाडीचा ‘आदर्श पॅटर्न’; 3.70 लाखांची पाणीपट्टी एकरकमी भरून जपली सामाजिक बांधिलकी!
कुकडी प्रकल्पाच्या पाण्यावर शेती करणारे अनेक शेतकरी (Shirur News) मोठ्या प्रमाणात उत्पन्न घेत असले तरी पाणीपट्टी भरण्याबाबत अनेकदा उदासीनता दिसून येते.

Shirur News : शिरूर तालुक्यातील (Shirur News) शरदवाडी (जांबूत) येथील संत ज्ञानेश्वर पाणी वापर संस्था व बाबरमळा के.टी. वेअर नळबंधारा, के.टी. वेअर शरदवाडी यांनी मीना शाखा कालव्यावरील पाटबंधारे विभागाकडे तब्बल ३ लाख ७० हजार ५२३ रुपयांची पाणीपट्टी एकरकमी भरत ‘आदर्श पॅटर्न’ निर्माण केला आहे.
या उपक्रमामुळे परिसरात ग्रामस्थांच्या एकजुटीचे कौतुक होत असून चेअरमन पैलवान प्रशांत जोरी यांचे विशेष अभिनंदन केले जात आहे.
कुकडी प्रकल्पाच्या पाण्यावर शेती करणारे अनेक शेतकरी (Shirur News) मोठ्या प्रमाणात उत्पन्न घेत असले तरी पाणीपट्टी भरण्याबाबत अनेकदा उदासीनता दिसून येते. परिणामी, पाणी मागणी करताना अडचणी निर्माण होतात आणि “पाणीपट्टीच नाही तर पाणी कसे सोडायचे?” असा प्रश्न अधिकाऱ्यांकडून उपस्थित केला जातो. यामुळे वेळेत पाणी न मिळाल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होते.
याच समस्येवर उपाय म्हणून शरदवाडी ग्रामस्थांनी पुढाकार घेत एकरकमी पाणीपट्टी भरून जबाबदारीची जाणीव करून दिली आहे. माजी आमदार पोपटराव गावडे व भीमाशंकरचे उपाध्यक्ष प्रदीप वळसे पाटील यांनीही पूर्वीच शेतकऱ्यांना पाणीपट्टी वेळेत भरण्याचे आवाहन करत “पाणीपट्टी भरली तरच पाण्यावरचा हक्क टिकतो,” असा इशारा दिला होता.
दरम्यान, कुकडी प्रकल्पाचे (Shirur News) मुख्य कार्यकारी अभियंता प्रशांत कडुसकर, उपविभागीय अभियंता रवींद्र हांडे, शाखाधिकारी अमित कुमावत व कुकडी कालवा सल्लागार समितीचे संचालक प्रकाश वायसे यांनी ग्रामस्थांच्या एकजुटीचे कौतुक करून अभिनंदन केले. “शरदवाडीने दाखवलेली सामाजिक बांधिलकी व एकजूट ही संपूर्ण तालुक्यासाठी मार्गदर्शक आहे,” असे मत जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र गावडे यांनी व्यक्त केले.






