Shirur News : खळबळजनक ! करडे येथील विहिरीत आढळला तलाठ्याच्या मृतदेह

शिरूर : करडे (ता. शिरूर) येथील पाबळ येथे कामगार तलाठी म्हणून कार्यरत असलेल्या पवन अशोक बांदल (वय ३२) यांचा मृतदेह त्यांच्या शेतातील विहिरीत आढळल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली असून, मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.
हाती आलेल्या माहितीनुसार, पवन बांदल मंगळवारी सकाळी नेहमीप्रमाणे पाबळ येथे कामावर जाण्यासाठी घरातून निघाले होते. त्यांनी दप्तर आणि जेवणाचा डबा सोबत घेतला होता. निघण्यापूर्वी त्यांचा भाऊ श्रीनिवास बांदल यांनी शेतातील विहिरीवरील मोटर चालू करण्यास सांगितले होते. दुपारी १२.४५ च्या सुमारास श्रीनिवास विहिरीकडे गेले असता, त्यांना पवन यांची गाडी आणि बॅग दिसली. विहिरीत पाहताच पवन यांचा मृतदेह पाण्यात तरंगताना आढळला. त्यांनी तात्काळ गावकऱ्यांना आणि पोलिसांना माहिती दिली.
पोलिस आणि स्थानिकांच्या मदतीने मृतदेह विहिरीतून बाहेर काढून शवविच्छेदनासाठी न्हावरे येथील रुग्णालयात पाठवण्यात आला. पवन यांनी अभियांत्रिकीचे शिक्षण घेऊन तलाठी परीक्षा उत्तीर्ण केली होती आणि ते पाबळ येथे कामगार तलाठी म्हणून कार्यरत होते. त्यांच्या अकस्मात निधनाने परिसरात शोक व्यक्त होत आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार बोथे करत आहेत.





