Shirur News – महाशिवरात्रीच्या पावन पर्वानिमित्त शिरूर तालुक्यातील प्रसिद्ध श्री रामलिंग मंदिरात यंदा भक्तांची विक्रमी गर्दी उसळल्याचे चित्र पाहायला मिळाले. रात्री १२ वाजल्यापासून मंदिरात भाविकांची वर्दळ सुरू झाली होती. तालुक्यासह पुणे जिल्ह्यातील विविध भागांमधून हजारो भक्त दर्शनासाठी येथे दाखल झाले. “हर हर महादेव” च्या जयघोषाने मंदिर परिसर दिवसभर दुमदुमून गेला.मंदिरात पहाटे विशेष पूजाविधींनी कार्यक्रमांची सुरुवात केली. यावेळी भगवान शंकराला पंचामृत अभिषेक, रुद्राभिषेक, दुग्धाभिषेक व बेलपत्र अर्पण करण्यात आले. पुजाऱ्यांनी वेदमंत्रोच्चारात महाआरती केली. भाविकांनी शिस्तीत दर्शन घेत भक्तिभावाने प्रार्थना केली. दिवसभर दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागल्या होत्या. अनेक भक्तांनी उपवास ठेवून, ओम नमः शिवायचा जप करत भगवान शंकराचे दर्शन घेतले. काही भक्तांनी कुटुंबासह सामूहिक पूजा करून आरोग्य, सुख-समृद्धी आणि शांतीसाठी प्रार्थना केली. मंदिर परिसरात आकर्षक फुलांची सजावट आणि रोषणाई केली होती. रात्री विद्युत दिव्यांनी मंदिर परिसर उजळून निघाला होता. संध्याकाळी विशेष आरतीनंतर भजन, कीर्तन आणि हरिपाठाचे आयोजन करण्यात आले. स्थानिक भजनी मंडळांनी शिवभक्तीपर गीतांनी वातावरण भारावून टाकले. अनेक भाविकांनी रात्रभर जागरण करत शिवनामाचा जप केला होता. मंदिर समितीच्या वतीने भाविकांसाठी पिण्याचे पाणी, प्रसाद वितरण, वैद्यकीय मदत व दर्शन रांगेचे नियोजन करण्यात आले होते. स्वयंसेवकांनी भाविकांना मार्गदर्शन करून शिस्तबद्ध व्यवस्था राखली. स्थानिक प्रशासन व पोलिसांनी वाहतूक नियंत्रणासाठी विशेष बंदोबस्त ठेवला होता. त्यामुळे गर्दी असूनही दर्शन प्रक्रिया सुरळीत पार पडली. मंदिर परिसरात जत्रेचे स्वरूप महाशिवरात्रीमुळे मंदिर परिसरात जत्रेचे स्वरूप आले होते. परिसरात फुलविक्रेते, पूजेचे साहित्य विक्रेते व अल्पोपहार, खेळणी स्टॉल्समुळे व्यापाऱ्यांनाही चांगली उलाढाल झाल्याचे दिसून आले. ग्रामस्थांनी भाविकांचे स्वागत करत सेवा कार्यात उत्साहाने सहभाग घेतला.शिरूर तालुक्यातील प्रमुख धार्मिक स्थळ म्हणून ओळख असलेल्या या मंदिरात दरवर्षी महाशिवरात्री मोठ्या भक्तिभावात साजरी होते. भगवान शंकराचे या दिवशी दर्शन घेतल्याने मनोकामना पूर्ण होतात, अशी भाविकांची श्रद्धा आहे. त्यामुळेच पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत भक्तांची सतत वर्दळ सुरू होती.