Shirur News : शिरूर-जुन्नर परिसरात बिबट्याच्या हल्ल्यांनी हादरली जनता; खासदार कोल्हेंनी घेतली दखल

शिरूर : शिरूर तालुका आणि जुन्नर परिसरात गेल्या दहा दिवसांत बिबट्याच्या हल्ल्यांमुळे दोन निरागस चिमुकल्यांचा मृत्यू झाल्याने संपूर्ण परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण पसरले आहे. शिरूर तालुक्यातील पिंपरखेड येथे पाच वर्षीय शिवन्या बोंबे हिचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला, तर काही दिवसांपूर्वी जुन्नर तालुक्यातील कुमशेत येथेही असाच दुर्दैवी प्रसंग घडला, ज्यामध्ये आणखी एका मुलाचा बळी गेला. या घटनांमुळे स्थानिक ग्रामस्थांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे.
खासदार अमोल कोल्हेंनी दिली भेट, व्यक्त केली खंत
या गंभीर परिस्थितीची दखल घेत शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी पिंपरखेड येथे भेट देऊन मयत शिवन्या बोंबेच्या कुटुंबियांचे सांत्वन केले. यावेळी त्यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करत तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या. ते म्हणाले, “दहा दिवसांत दोन निरागस मुलांचा जीव गेला, ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे. या समस्येवर उपाययोजना करण्यासाठी मी वारंवार पत्रव्यवहार करत आहे, परंतु मुख्यमंत्री यांना कृती आराखड्यासाठी वेळ नाही. कबुतरांसाठी वेळ असणाऱ्या मुख्यमंत्र्यांना आमच्या लेकरांसाठी वेळ नाही, हे खेदजनक आहे.”
वनविभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह
यावेळी सहाय्यक वनसंरक्षक स्मिता राजहंस आणि वनपरिक्षेत्र अधिकारी निळकंठ गव्हाणे यांनी खासदार कोल्हे यांना घटनेची माहिती दिली. स्मिता राजहंस यांनी पिंजऱ्यांची कमतरता असल्याने अडचणी येत असल्याचे सांगितले. यावर कोल्हे यांनी तीव्र शब्दांत प्रतिक्रिया देत म्हटले, “एका चिमुकल्याचा जीव जाणे ही फार मोठी हानी आहे. ही भरपाई होऊ शकत नाही. लवकरच पालकमंत्र्यांसोबत मीटिंग आहे, त्यात मी स्वतः उपस्थित राहणार आहे. तुम्ही निर्भीडपणे उपाययोजनांसाठी आवश्यक बाबी मांडा.”
ग्रामस्थांचा संताप आणि आंदोलनाची तयारी
पिंपरखेड येथील ग्रामस्थांनी वनविभागाच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली. “आमचा जीव महत्त्वाचा की बिबट्याचा? आमच्या लेकरांचे संरक्षण प्राधान्याने व्हायला हवे,” अशी संतप्त भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली. या पार्श्वभूमीवर, बेल्हे-जेजुरी राज्य मार्गावर येत्या गुरुवारी (दि. १६ ऑक्टोबर) मोठ्या जनआंदोलनाची हाक प्रफुल्ल बोंबे यांनी दिली. या आंदोलनाच्या इशाऱ्यावेळी खासदार अमोल कोल्हे, सहाय्यक वनसंरक्षक स्मिता राजहंस, वनपरिक्षेत्र अधिकारी निळकंठ गव्हाणे आणि मंचर बाजार समितीचे माजी सभापती देवदत्त निकम उपस्थित होते.
परिसरात भीतीचे वातावरण
या घटनांमुळे शिरूर आणि जुन्नर परिसरातील गावकऱ्यांमध्ये भीती आणि असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. ग्रामस्थांच्या चेहऱ्यावर दुःख आणि राग स्पष्ट दिसत आहे. बिबट्याच्या हल्ल्यांमुळे निर्माण झालेल्या या संकटावर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी जोर धरत आहे. आगामी जनआंदोलनातून ग्रामस्थ आपला आवाज बुलंद करणार असून, वनविभाग आणि प्रशासनाकडून ठोस पावले उचलली जावीत, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.





