प्रभात वृत्तसेवा शिक्रापूर ( शेरखान शेख ) – शिरूर तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्याने नागरिकांसह हजारो पशुधनाचे बळी जात असताना, पकडलेल्या बिबट्यांना ठेवण्यासाठी पुणे जिल्ह्यात एकमेव माणिकडोह (जुन्नर) बिबट निवारण केंद्र आहे. हे अंतर अधिक असल्याने आणि तालुक्यात बिबट्यांची वाढती संख्या पाहता, शिरूर तालुक्यासाठी स्वतंत्र बिबट निवारण केंद्र असणे ही आता काळाची गरज बनली आहे. शिरूर तालुक्यात वीस दिवसांत तीन नागरिकांचा बिबट्याने बळी घेतल्यामुळे तालुक्यात झालेल्या आंदोलनाची दखल थेट वनमंत्री, उपमुख्यमंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांना घ्यावी लागली होती. तालुक्यात सिंचन व्यवस्था असल्यामुळे उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे. उसाच्या शेतात बिबट्यांना निवारा आणि भक्ष मिळत असल्याने त्यांची संख्या वाढली आहे. मात्र, याचा परिणाम नागरिक आणि जनावरांना भोगावा लागत आहे. शिरूर तालुक्यात पकडलेले बिबटे माणिकडोह येथे न्यावे लागत असल्याने वन विभागाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मोठ्या अडचणी येत आहेत. तसेच, एखादा बिबट्या जेरबंद झाल्यावर पुन्हा पिंजरे मिळणे कठीण होते. शिरूरमध्ये केंद्र झाल्यास आजूबाजूच्या भागातील बिबट्यांचे संगोपन करणे सोपे जाईल आणि नागरिकांना शेतीच्या कामांमध्ये मुक्तता मिळेल. निसर्ग वन्यजीव सामाजिक संस्थेचे सचिव अमर गोडांबे यांनी सांगितले की, मोराची चिंचोली परिसरात भविष्यकाळात बिबट निवारा केंद्र झाल्यास पर्यटनालाही मोठी चालना मिळेल. माणिकडोहच्या धर्तीवर शिरूर तालुक्यात बिबट निवारा केंद्र झाल्यास जखमी बिबट्या व वन्य प्राण्यांवर वेळेवर उपचार मिळवणे सोपे होईल, असे मत नेचरगार्ड ऑर्गनायझेशन संस्थेच्या सचिव शुभांगी टिळेकर यांनी व्यक्त केले. वरिष्ठ पातळीवरून हालचाली सुरू शिरूर तालुक्यातील सध्याच्या घटना पाहता, वरिष्ठ पातळीवरून बिबट निवारा केंद्र बनविण्याच्या हालचाली व जागा पाहण्याचे काम सुरू आहे. शिरूर तालुक्यात स्वतंत्र बिबट निवारा केंद्र झाल्यास तालुक्यात पकडलेले बिबटे त्याच ठिकाणी ठेवून त्यांचे संगोपन करता येईल. फक्त त्याची मर्यादा जास्त असल्यास शिरूरसह आजूबाजूच्या परिसराला त्याचा नक्कीच फायदा होईल, असे शिरूर वनपरिक्षेत्र अधिकारी निळकंठ गव्हाणे यांनी सांगितले.