Shirur News : शिरूर पोलिसांची धडक कारवाई; विद्युत रोहित्र फोडणारी टोळी गजाआड
शिरूर तालुक्यात (Shirur News) गेल्या अनेक महिन्यांपासून विद्युत रोहित्र (डीपी) फोडून त्यामधील तांब्याच्या तारा चोरणाऱ्या एका सराईत टोळीने महावितरण आणि स्थानिक शेतकऱ्यांची अक्षरशः झोप उडवली होती.

Shirur News : शिरूर तालुक्यात (Shirur News) गेल्या अनेक महिन्यांपासून विद्युत रोहित्र (डीपी) फोडून त्यामधील तांब्याच्या तारा चोरणाऱ्या एका सराईत टोळीने महावितरण आणि स्थानिक शेतकऱ्यांची अक्षरशः झोप उडवली होती. शेतातील वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याने पिकांना पाणी देण्यास मोठे अडथळे निर्माण होत होते, तर दुसरीकडे अनेक गावांमध्ये अंधाराचे साम्राज्य पसरत असल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संतापाची भावना होती.
या चोऱ्यांमुळे महावितरणलाही लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान सहन करावे लागत होते. या गंभीर गुन्ह्यांचा छडा लावत शिरूर पोलिस ठाण्याच्या डीबी (डिटेक्शन ब्रँच) पथकाने अत्यंत नियोजनबद्ध आणि धाडसी कारवाई करत दोन सराईत आरोपींना जेरबंद करण्यात मोठे यश मिळवले आहे.
पकडण्यात आलेल्या आरोपींकडून तब्बल १८ गुन्ह्यांची उकल झाली असून सुमारे साडेचार लाख रुपये (Shirur News) किमतीच्या ३०० किलो तांब्याच्या तारा आणि चोरीसाठी वापरलेली मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे. या धडक कारवाईमुळे शिरूर तालुक्यासह परिसरातील डीपी चोरीच्या मालिकेला मोठा आळा बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
या संपूर्ण गुन्हेगारी सत्राची सुरुवात १ ते २ जानेवारी २०२६ या कालावधीत आण्णापूर येथील येवलेमाथा परिसरात झाली होती. तेथील दत्तात्रय कापरे व शेख मुलाणी यांच्या शेतातील विद्युत रोहित्र फोडून अज्ञात चोरट्यांनी त्यामधील सुमारे १५० किलो वजनाच्या तांब्याच्या तारा लंपास केल्या होत्या.
या प्रकरणी गणेश राजेंद्र दिघे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिरूर पोलिस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ०५/२०२६ अन्वये भारतीय विद्युत कायदा कलम १३६ व भारतीय न्याय संहिता कलम ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता, ज्याचा तपास पोलीस हवालदार शरद वारे यांच्याकडे सोपविण्यात आला होता.
मात्र, त्यानंतरही हद्दीत डीपी फोडण्याच्या घटना थांबत नव्हत्या. दिवसेंदिवस वाढणाऱ्या चोऱ्यांमुळे शेतीसोबतच स्थानिक उद्योगधंदेही अडचणीत आले होते. ही गंभीर परिस्थिती पाहता पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांनी डीबी पथकाला विशेष सूचना देऊन तातडीने शोध मोहीम राबवण्याचे आदेश दिले. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली तपासाची चक्रे फिरवण्यात आली.
तपासादरम्यान पोलिसांनी गुप्त बातमीदारांचे जाळे सक्रिय (Shirur News) केले, तसेच विविध ठिकाणच्या सीसीटीव्ही फुटेजचे परीक्षण आणि तांत्रिक विश्लेषण करून संशयितांच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवले.
यादरम्यान पोलीस अंमलदार विजय शिंदे यांना एक खात्रीशीर गोपनीय माहिती मिळाली की, डीपी चोरी करणारे संशयित संतोष बारकु भालेराव आणि किरण गोविंद खंडांगळे (दोघेही रा. जळुके बुद्रुक, ता. खेड, जि. पुणे) हे शिरूर येथील हुडको कॉलनी परिसरात येणार आहेत.
माहिती मिळताच डीबी पथकाने वेळ न घालवता हुडको कॉलनी भागात अत्यंत शिताफीने सापळा रचून या दोघांना ताब्यात घेतले. सुरुवातीला पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे देणाऱ्या या आरोपींनी पोलिसी खाक्या दाखवताच अखेर आण्णापूर येथील चोरीची कबुली दिली. त्यानंतर पोलीस कोठडीत घेतलेल्या अधिक चौकशीत त्यांनी आपल्या इतर साथीदारांच्या मदतीने टाकळी हाजी बेट परिसरासह तब्बल १८ ठिकाणी डीपी फोडल्याची धक्कादायक कबुली दिली.
आरोपींच्या या कबुलीजबाबानंतर शिरूर पोलीस ठाण्यात दाखल असलेले गुन्हा क्रमांक ०५, ३३, ४१, ५४, ११५, ११६, १२७, १४६, १४७, १७३, १८३, २४९, २५१, २९१, ३५०, ४००, ५९८ आणि ६१८/२०२६ या एकूण १८ गुन्ह्यांचा छडा लागला.
पोलिसांनी आरोपींकडून साडेचार लाख रुपये किमतीच्या ३०० किलो तांब्याच्या तारा आणि गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल जप्त केली आहे. आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना १० जुलै २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून, या गुन्ह्यातील त्यांचे इतर साथीदार, चोरीचा मुद्देमाल खरेदी करणारे रॅकेट आणि इतर जिल्ह्यांतील गुन्ह्यांचा सखोल तपास पोलीस करत आहेत.
ही उल्लेखनीय आणि कौतुकास्पद कारवाई पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक डॉ. शुभम कुमार, उपविभागीय पोलीस अधिकारी रविंद्र भोसले आणि पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांच्या थेट मार्गदर्शनाखाली पार पडली. या मोहिमेत पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण, पोलीस हवालदार शरद वारे, अक्षय कळमकर तसेच पोलीस अंमलदार विजय शिंदे, निखील रावडे, नितेश थोरात, निरज पिसाळ, अंबादास थोरे, सचिन भोई, वैभव शेलार, रविंद्र काळे, दादाराव नागरे आणि अजय पाटील यांनी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली. शिरूर पोलिसांच्या या तत्परतेमुळे शेतकरी आणि ग्रामस्थांनी सुटकेचा श्वास सोडला असून पोलिसांचे सर्वत्र आभार मानले जात आहेत.






