प्रभात वृत्तसेवा रांजणगाव गणपती – राज्याचे वनमंत्री शिरूर तालुक्याच्या दौऱ्यावर असतानाच, वाघाळे गावात बिबट्याने हल्ला करून १० शेळ्या व बकऱ्यांचा फडशा पाडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.पहाटेच्या सुमारास बिबट्याने बाळासाहेब रमाजी थोरात यांच्या शेळ्या व मेंढ्यांवर हल्ला केला, ज्यात अनेक जनावरे ठार झाली. या हल्ल्यामुळे थोरात यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. वनमंत्र्यांच्या दौऱ्याच्या दिवशीच ही घटना घडल्यामुळे बिबट्यांच्या हालचालींबाबत प्रशासनाकडून होत असलेल्या उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.स्थानिक ग्रामस्थांनी वनविभागाकडे तात्काळ नुकसानभरपाई देण्याची आणि बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरे लावण्याची मागणी केली आहे. वनविभागाने ठोस उपाययोजना न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. याप्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य शेखर पाचुंदकर, वाघाळे गावच्या सरपंच अनिता गावडे , सतीश पाचंगे, दत्तात्रय पाचुंदकर, माजी सरपंच अमोल धरणे, माजी उपसरपंच राजेंद्र भोसले, विजय गावडे, रावसाहेब थोरात, बाळासाहेब थोरात आदी उपस्थित होते.दरम्यान वनपरिक्षेत्र अधिकारी निळकंठ मोहिते यांच्याशी संपर्क साधला असता, वाघाळ्यातील घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा केल्याचे त्यांनी सांगितले.