जांबुत : शिरूर तालुक्याच्या पश्चिम बेट भागात चोरीच्या घटनांमध्ये पुन्हा एकदा वाढ झाली आहे. पिंपरखेड (ता. शिरूर) येथे दोन दिवसांपूर्वी गावठाण परिसरातील हॉटेल दत्तकृपाच्या शटर उचकटून झालेली चोरी ताजी असतानाच, शनिवारी (दि. १६) पहाटे दत्तवाडी, शेळकेमळा परिसरात चोरट्यांनी धुमाकूळ घातला. शेतकरी बबन सोनू बोंबे यांच्या घराचा कडी-कोयंडा तोडून चोरट्यांनी प्रवेश केला. घरात कोणी नसल्याने कपाट उघडून कपडे आणि साहित्य अस्ताव्यस्त करून चोरट्यांनी पलायन केले. यानंतर त्यांनी अशोक टाकळकर यांच्या घराच्या कडी उघडण्याचा प्रयत्न केला. तसेच, ढोमेमळा-शेळकेवस्ती परिसरात एकनाथ शेळके, रंगनाथ शेळके आणि अतुल शेळके यांच्या घरांवर चोरीचा प्रयत्न केला. मात्र, नागरिकांच्या सतर्कतेमुळे चोरी टळली, तरी अतुल शेळके यांच्या घराच्या दरवाज्याचा कडी-कोयंडा उघडण्याचा प्रयत्न झाला. या सातत्याने वाढणाऱ्या चोरीच्या घटनांमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. यापूर्वीही या भागात दुचाकी, कृषीपंप, कृषीयंत्रे आणि केबल चोरीच्या अनेक घटना घडल्या आहेत. मात्र, पोलिसांना या गुन्हेगारांना पकडण्यात अपयश येत आहे. नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही पोलिसांकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप होत आहे. रात्रीच्या वेळी गस्त घालण्याची नागरिकांची जुनी मागणी आहे. रात्री गस्त वाढवल्यास अशा चोरीच्या घटनांवर अंकुश बसू शकतो, असे नागरिकांचे मत आहे. तरीही, पोलिस प्रशासनाकडून रात्री गस्त घालण्यास असमर्थता दिसून येत असल्याने नागरिकांमध्ये पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. वाडी-वस्त्यांवर नियमित गस्त घालण्याची मागणी परिसरातील भयभीत नागरिकांनी केली आहे.