Shirur News : बिबट्याच्या हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांची वनमंत्र्यांनी घेतली सांत्वनपर भेट

जांबुत : शिरूर, आंबेगाव आणि जुन्नर परिसरात गेल्या महिनाभरात बिबट्याच्या हल्ल्यात झालेल्या दुर्दैवी मृत्यूंनंतर राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी बुधवारी (दि. १२) मृतांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली. यावेळी त्यांनी बिबट्या जेरबंद करण्याच्या कारवाईला गती देण्याचे निर्देश दिले असून, नरभक्षक बिबट्यांना ठार मारण्याचे आदेश वन विभागाला दिले आहेत. तसेच, जेरबंद बिबटे लवकरच गुजरातमधील वनतारा केंद्रात हलविण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
बुधवारी बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या रोहन बोंबे, शिवन्या बोंबे आणि भागुबाई जाधव यांच्या कुटुंबीयांना भेट देऊन सांत्वन करताना वनमंत्री नाईक बोलत होते. “गेलेला जीव परत आणता येत नाही, पण पुढील घटना टाळण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. जुन्नरच्या माणिकडोह बिबट निवारण केंद्रातून २० बिबटे तातडीने गुजरातला पाठवले जातील. नरभक्षक बिबटे आढळल्यास त्यांना ठार मारण्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत,” असे त्यांनी सांगितले.
1200 पिंजऱ्यांची व्यवस्था
वनमंत्री नाईक यांनी बिबट्या प्रश्नावर राज्यभर उपाययोजना सुरू असल्याचे सांगितले. पुणे आणि अहिल्यानगर जिल्ह्यासाठी प्रत्येकी ११ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यातून सुमारे १,२०० पिंजऱ्यांची व्यवस्था करण्यात आली असून, हे पिंजरे लवकरच कार्यान्वित होणार आहेत. “बिबट्या जेरबंद होईपर्यंत नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी आणि वन विभागाला सहकार्य करावे,” असे आवाहनही त्यांनी केले.
यावेळी शिरूरचे माजी आमदार पोपटराव गावडे, जुन्नरचे उपवनसंरक्षक प्रशांत खाडे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले, सहायक वनसंरक्षक स्मिता राजहंस, तहसीलदार बाळासाहेब म्हस्के, पोलीस निरीक्षक संदेश केंजळे, भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे, माजी अध्यक्ष देवदत्त निकम, माजी जिल्हा परिषद सदस्य आशा बुचके, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र गावडे, उद्योजक किसनराव उंडे, सावित्रा थोरात, गणेश कवडे, बाळासाहेब डांगे यांसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
गणेश नाईकांनी दिले आश्वासन
रोहन बोंबेच्या दुर्दैवी घटनेनंतर संतप्त झालेल्या जमावाकडून वनविभागाचे वाहन व कार्यालय जाळण्यात आले होते तसेच ग्रामस्थांनी पुणे – नाशिक महामार्ग अडवून पंधरा तासाहून अधिक काळ रास्ता रोको केला याप्रश्नी दाखल करण्यात आलेले गुन्हे हे मागे घेण्यात यावेत असे प्रश्न ग्रामस्थांनी उपस्थित केले प्रसंगी वनविभाग याबाबत गुन्हे दाखल करणार नसून आंदोलनातील दाखल केलेले गुन्हे मागे घेण्याचे निर्देश पोलिसांना देऊ असे आश्वासन यावेळी वनमंत्री गणेश नाईक यांनी दिले.




