Shirur News : धर्मांतराच्या विरोधात शिरूरमध्ये सकल हिंदू समाजाचा एल्गार; धर्मांतरबंदी कायद्याची केली मागणी

शिरूर : सांगली येथील यशवंतनगरमधील सात महिन्यांची गर्भवती ऋतुजा सुकुमार राजगे हिच्या ख्रिश्चन धर्मांतराच्या दबावाखाली आत्महत्येच्या धक्कादायक घटनेनंतर राज्यभर संतापाचे वातावरण आहे. याच पार्श्वभूमीवर आणि शिरूर तालुक्यातील वाढत्या धर्मांतराच्या घटनांना विरोध करण्यासाठी आज सकल हिंदू समाजाच्या वतीने शिरूर शहरात भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले.
मोर्चाची सुरुवात आणि नागरिकांचा सहभाग
मोर्चाची सुरुवात शिरूर येथील बाजार समितीच्या आवारातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून झाली. या मोर्चात महिलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग दिसून आला. कार्यकर्त्यांनी ‘प्राण सोडला पण धर्म नाही सोडला’, ‘धर्मांतर बंदी कायदा करा’, ‘हिंदूंचे धर्मांतर थांबवा’ अशा फलकांसह छत्रपती शिवाजी महाराज आणि ऋतुजा राजगे यांच्या छायाचित्रांसह जुन्या पुणे-अहिल्यानगर मार्गे तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. तहसीलदार बाळासाहेब म्हस्के आणि उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत ढोले यांना निवेदन सादर करण्यात आले.
मान्यवरांचे विचार आणि कडक कायद्याची मागणी
सभेत आमदार महेश लांडगे, ह.भ.प. संग्राम बापू भंडारे, भाजप प्रदेश सचिव ॲड. वर्षा डहाळे, नानाजी पडळकर यांनी आपले विचार मांडले. आमदार लांडगे यांनी म्हणाले, “राज्यात धर्मांतरबंदी कायदा तात्काळ लागू करावा. हा कायदा कठोर असावा आणि इतर राज्यांना प्रेरणा द्यावा.” ॲड. वर्षा डहाळे यांनी महिला आयोगावर टीका करताना, “ऋतुजा राजगे यांच्या मृत्यूसारख्या गंभीर प्रकरणाची महिला आयोगाने दखल का घेतली नाही? आयोग झोपेत आहे का?” असा सवाल केला.
अनधिकृत चर्च हटवण्याचा इशारा
आमदार लांडगे यांनी प्रशासनाला इशारा देताना सांगितले, “शिरूर तालुक्यातील काठापूर, पिंपरखेड, जांबुत, टाकळी हाजी येथील अनधिकृत चर्च तीन महिन्यांत हटवावेत. हिंदूंवर खोटे गुन्हे दाखल करणाऱ्यांची सखोल चौकशी झाली पाहिजे, अन्यथा विधानसभेत उभे राहून बोलावे लागेल.” राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, बजरंग दल, शिवबा संघटना, सकल हिंदू समाज आणि इतर सामाजिक-राजकीय संघटनांचे कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले. सभेचे प्रास्ताविक नामदेव घावटे, निवेदन सादर व सूत्रसंचालन गणेश पवार आणि आभार प्रदर्शन संग्राम भंडारी यांनी केले.





