Shirur News : वृद्ध महिलेला मिळाले न्यायाचे मंगळसूत्र; शिरूर पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी

शिरूर : समाजातील ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी पार पाडताना शिरूर पोलीसांनी पुन्हा एकदा आपली तत्परता व कर्तव्यदक्षता सिद्ध केली आहे. पायी चालणाऱ्या ७७ वर्षीय वृद्ध महिलेच्या गळ्यातील दिड तोळ्याचे सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून पळ काढणाऱ्या चोरट्यांकडून पोलीसांनी सदर मंगळसूत्र हस्तगत करून ते न्यायालयाच्या आदेशानुसार मूळ मालकिणीच्या सुपूर्त केले आहे.
ही घटना दिनांक २७ जानेवारी २०२५ रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडली. मौजे संविदणे (ता. शिरूर) गावच्या हद्दीत मलठण–नारायणगाव अष्टविनायक हायवे रोडवरील बंटी हॉटेलच्या पुढे असलेल्या रस्त्यावरून धुमाळस्थळाकडे चाललेल्या वस्त्सलाबाई दत्तात्रय सुके (वय ७७, रा. खडकवाडी, ता. आंबेगाव) या वृद्ध महिलेच्या गळ्यातील दिड तोळ्याचे, अंदाजे १,१०,०००/- रूपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र दोन अज्ञात इसमांनी जबरदस्तीने हिसकावून मोटारसायकलवरून पलायन केले होते. या घटनेनंतर शिरूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर करण्यात आला होता.
पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली, सहायक पोलीस निरीक्षक दिपक करांडे आणि पोलीस अंमलदार भाउसाहेब ठोसरे यांनी तपासाची चोख भूमिका बजावत, आरोपी १) अनिल सोमनाथ गव्हाणे आणि २) अनिल नारायण गव्हाणे (दोघेही रा. गव्हाणेवाडी, ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर) यांना अटक करून त्यांच्या ताब्यातून चोरीस गेलेले मंगळसूत्र जप्त केले. प्रकरणातील जप्त मंगळसूत्र न्यायालयाच्या आदेशानुसार दिनांक ३० जून २०२५ रोजी वस्त्सलाबाई दत्तात्रय सुके यांना अधिकृतपणे सुपूर्त करण्यात आले.
या उल्लेखनीय कामगिरीमागे पोलीस अधीक्षक संदीप गिल, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले, तसेच शिरूर पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांचे महत्वपूर्ण मार्गदर्शन लाभले. कारवाईमध्ये पोलीस हवालदार बापु मांगडे आणि पोलीस अंमलदार भाउसाहेब ठोसरे यांचे मोलाचे योगदान राहिले. शिरूर पोलिसांची ही तातडीने व काटेकोर केलेली कारवाई समाजात सुरक्षिततेचा विश्वास वाढवणारी ठरली आहे.





