Shirur News : शिरूर ग्रामीण रुग्णालयात दंतचिकित्सा सेवा ठप्प !

शिरूर : शिरूर येथील ग्रामीण रुग्णालय, जे सर्वसामान्य ग्रामीण जनतेच्या आरोग्यसेवेचा केंद्रबिंदू आहे. तिथे दंतचिकित्सकांना आवश्यक उपचार साधनसामग्री उपलब्ध नसल्याने दंतचिकित्सा सेवा सुरळीतपणे सुरू होत नाही. ही बाब अत्यंत खेदजनक असून, याची गंभीर दखल घेत सामाजिक कार्यकर्ते आणि व्हिसल ब्लोअर निलेश मंंदा यशवंत वाळुंज यांनी शिरूर ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकांना निवेदनाद्वारे ही समस्या निदर्शनास आणली आहे.
वाळुंज यांनी नमूद केले की, दंतचिकित्सक उपलब्ध असतानाही साधनसामग्रीच्या अभावामुळे रुग्णसेवा ठप्प होणे हे यंत्रणेच्या अकार्यक्षमतेचे द्योतक आहे आणि यामुळे ग्रामीण भागातील सामान्य नागरिकांच्या आरोग्यावर अन्याय होत आहे. त्यांनी प्रशासनाला सौम्य पण ठाम शब्दांत विनंती केली आहे की, रुग्णहितासाठी या निवेदनाचा गांभीर्याने विचार करून तातडीने आवश्यक साधने उपलब्ध करावीत, जेणेकरून रुग्णांना वेळेवर आणि योग्य उपचार मिळू शकतील आणि त्यांचे आर्थिक नुकसान टळेल.
ही मागणी सामाजिक जबाबदारी आणि लोककल्याणाच्या भावनेतून केली गेली आहे. या निवेदनाची प्रत पुणे जिल्हा शल्यचिकित्सकांना ईमेलद्वारे पाठवण्यात आली असून, यंत्रणांनी समन्वय साधावा, अशी अपेक्षा वाळुंज यांनी व्यक्त केली आहे.
सद्यस्थितीत ग्रामीण आरोग्यव्यवस्थेच्या मजबुतीसाठी अशा सकारात्मक आणि बांधिलकीने केलेल्या मागण्या ही काळाची गरज आहे. प्रशासनानेही हे लक्षात घेऊन तात्काळ कृती करावी, हीच सर्वसामान्य जनतेची अपेक्षा आहे.
निलेश मंंदा यशवंत वाळुंज
सामाजिक कार्यकर्ते / व्हिसल ब्लोअर





