जांबुत – शिरूरच्या बेट भागातील जांबुत (शरदवाडी) परिसरात शनिवार (दि. १८) रोजी रात्री साडेआकरा वाजेच्या सुमारास सिंधुबाई शांताराम गुजर या महिलेच्या घरी घरफोडी करून त्यांना जबर मारहाण करत त्यांच्या अंगावरील अडीच तोळे सोने ओरबडून अज्ञात चोरट्यांनी पोबारा केला. यावेळी सिंधुबाई गुजर यांना जबर मारहाण करण्यात आली असून स्थानिकांनी त्यांनी उपचारासाठी खाजगी दवाखान्यात दाखल केले होते. चोरीच्या या घटनेत गुजर यांचे सुमारे अडीच लाख रुपयांचे सोने चोरीस गेले असून या चोरट्यांचा तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणी पैलवान प्रशांत जोरी यांनी केली. या घटनेची माहिती मिळताच शिरूरचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या सूचनेवरून पोलीस उपनिरीक्षक दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली टाकळी हाजी दूरक्षेत्राच्या रात्रगस्तीवर असणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला आहे. जांबुत (शरदवाडी) परिसरात असलेल्या जोरीलवण वस्तीवर सिंधुबाई गुजर या घरात एकट्याच राहत असून रात्रीच्या वेळी त्या जेवण करून झोपलेल्या असताना तीन चोरट्यांनी त्यांच्या दारावरती दगड टाकून टिकावाच्या साह्याने घराचा दरवाजा तोडून घरामध्ये प्रवेश केला व सिंधुबाई गुजर यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी त्यांच्या कानातील दागिने ओरबडून अंगावरील दागिने हिसकावून घेत चोरटे आपल्या दुचाकीवरून पंचतळे, पिंपरखेड च्या बाजूला पळून गेले असल्याचे स्थानिकांनी यावेळी सांगितले. यावेळी जोरीलवण वस्तीवरील चोरट्यांचा पाठलाग केला असता पंचतळे परिसरात आपली दुचाकी सोडून अंधारात चोरट्यांनी पळ काढला. मागील पंधरा दिवसापासून या भागात भागात बिबट्याने हौदोस माजवला असल्यामुळे रात्रीच्या वेळी नागरिक घराबाहेर पडण्यास घाबरत आहेत अशातच बिबट्यांची भीती नागरिकांच्या मनामध्ये असून त्यात अशा प्रकारच्या होणाऱ्या चोऱ्यांमुळे जांबुत परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे एका बाजूला बिबट्याची भीती आणि दुसऱ्या बाजूला चोरट्यांचा धुमाकूळ यामुळे या परिसरातील महिलांसह ग्रामस्थ देखील भयभीत झाले असून तातडीने या चोरट्यांचा बंदोबस्त करून त्यांना जेरबंद करावे अशी मागणी जमत आणि परिसरातील नागरिकांनी केली आहे. शिरूर पोलीस स्टेशनच्या माध्यमातून अनेक गुन्ह्यांचा छडा या आधीच्या काळात लागलेला आहे. मागील तीन-चार महिन्यांपूर्वी या भागात अनेक शेतकऱ्यांची कृषी पंप आणि केबलच्या चोरीने शेतकरी संतप्त झाले होते. मात्र चोरीच्या घटनांमधील चोरट्यांना पकडण्यात पोलिसांना अपयश आल्याचे दिसून येते मात्र यापुढील काळात अशा प्रकारच्या चोऱ्या वाढण्याची चिंता या भागातील नागरिकांनी व्यक्त केली असून पोलीस प्रशासनाने आपल्या कामात दिरंगाई न करता रात्रीच्या वेळी वडनेर खुर्द, शरदवाडी, जांबुत, पिंपरखेड, चांडोह, फाकटे आणि काठापुर खुर्द या भागात रात्रीची गस्त वाढवावी अशी मागणी देखील जांबुत व पिंपरखेड ग्रामस्थांनी केली आहे.