शिरूर : शिरूर तालुक्यातील न्हावरे गावात शेतजमिनीच्या वाटपावरून दोन कुटुंबांमध्ये झालेल्या वादातून पाच जणांना शिवीगाळ, दमदाटी आणि काठी-उसाच्या टिपऱ्याने मारहाण झाली. या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना ३ जून २०२५ रोजी सायंकाळी ६:१५ वाजण्याच्या सुमारास न्हावरे येथे घडली. फिर्यादी महेश हनुमंत देशमुख (वय ३०, शेती, रा. न्हावरे) यांच्या घरी आरोपी त्रिंबक दादाभाऊ हिंगे, कमल त्रिंबक हिंगे, साधना शंकर देशमुख आणि यशश्री सचिन हिंगे (सर्व रा. न्हावरे) यांनी हल्ला चढवला. शेतजमिनीच्या वादातून सुरू झालेल्या या भांडणात कमल हिंगे यांनी महेश यांच्या पाठीवर उसाच्या टिपऱ्याने मारहाण केली. साधना देशमुख आणि त्रिंबक हिंगे यांनी महेश यांच्या बहिणी प्रियंका आणि रूपाली यांना केसाला धरून ओढले आणि लाथाबुक्क्यांनी मारले. त्रिंबक हिंगे यांनी महेश यांच्या आई मंदा देशमुख यांच्यावर काठीने हल्ला करून गंभीर दुखापत केली. प्रियंका यांनाही डोक्यात आणि हातावर काठीने मारहाण झाली. यानंतर “पुन्हा आमच्या नादाला लागलात तर चेंदामेंदा करून टाकू,” अशी जिवे मारण्याची धमकी देण्यात आली. या प्रकरणाचा तपास सहाय्यक फौजदार बनकर करत आहेत. या घटनेमुळे न्हावरे गावात तणावाचे वातावरण आहे. शेतजमिनीच्या वादातून वांशिक संघर्ष निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता, पोलीस प्रशासन सतर्क झाले आहे.