शिरूर : शिरूर तालुक्यातील पिंपरखेड गावात घडलेल्या एका हृदयद्रावक घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे. साडेपाच वर्षांच्या निरागस चिमुकली शिवन्या बोंबेवर बिबट्याने हल्ला करून तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे शिरूर, आंबेगाव, जुन्नर आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील ग्रामस्थांमध्ये प्रचंड संताप निर्माण झाला आहे. वाढत्या बिबट्यांच्या दहशतीविरोधात आणि प्रशासनाच्या निष्क्रियतेच्या निषेधार्थ संतप्त नागरिकांनी बेल्हा-जेजुरी-मी महामार्गावरील पंचतळे (जांबूत) चौकात रास्ता रोको आंदोलन करत चक्काजाम केला. पावसातही ठाम भूमिका आंदोलनादरम्यान अचानक मुसळधार पावसाला सुरुवात झाली, परंतु ग्रामस्थांनी आपला ठिय्या सोडला नाही. “आमच्या शिवन्याला न्याय द्या, बिबट्यांपासून आमचे रक्षण करा!” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. पावसात भिजतही नागरिकांनी प्रशासनाविरोधात जोरदार निदर्शने केली. या आंदोलनात माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, माजी मंत्री सदाभाऊ खोत, माजी आमदार पोपटराव गावडे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अरुण गिरे, माजी सदस्य सुरेश भोर, पंचायत समितीचे माजी सदस्य डॉ. सुभाष पोकळे, अरुणा घोडे, दामुशेठ घोडे, शेतकरी संघटनेचे नेते शिवाजीराव नांदखीले, माऊली ढोमे यांच्यासह अनेक गावांचे सरपंच, शेतकरी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले. विशेषतः महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. प्रशासन आणि वनविभागाची भूमिका घटनास्थळी वनविभागाचे उपवनसंरक्षक प्रशांत खाडे, सहायक वनसंरक्षक स्मिता राजहंस, वनपरीक्षेत्र अधिकारी निळकंठ गव्हाणे, पोलिस निरीक्षक संदेश केंजळे, पोलिस उपनिरीक्षक दिलीप पवार, शुभम चव्हाण, राहुल भागवत आणि कर्मचारी उपस्थित राहून आंदोलकांशी चर्चा करत परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. संतप्त ग्रामस्थांनी वनविभागाकडून तातडीने ठोस उपाययोजना करण्याची मागणी केली. त्यांनी बिबट्यांना पकडून सुरक्षित ठिकाणी हलवावे आणि संपूर्ण परिसर बिबट्यामुक्त करावा, अशी मागणी लावून धरली. तहसीलदारांना निवेदन, दोन दिवसांचा इशारा शिरूरचे तहसीलदार बाळासाहेब म्हस्के यांनी घटनास्थळी उपस्थित राहून आंदोलकांशी संवाद साधला. त्यांनी सर्व मागण्या जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनापर्यंत पोहोचवण्याचे आश्वासन दिले. यावेळी मृत शिवन्या बोंबेची तीन महिन्यांची बहीण शरयु बोंबे, आई दिव्या बोंबे आणि नागरिकांनी तहसीलदारांना मागण्यांचे निवेदन सादर केले. ग्रामस्थांनी चेतावणी दिली की, जर येत्या दोन दिवसांत मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर सोमवार (20 ऑक्टोबर 2025) पासून पुन्हा चक्काजाम आंदोलन आणि उपोषण सुरू केले जाईल.या निर्धारपूर्ण आंदोलनामुळे प्रशासन आणि वनविभागावर बिबट्यांच्या दहशतीविरोधात ठोस कारवाई करण्याचा दबाव वाढला आहे.