Shirur News : निमोणेतील शेती रस्ता वाद मिटला; तहसीलदारांच्या पुढाकाराने रस्ता खुला

शिरूर : शिरूर तालुक्यातील निमोणे गावातील भोस वस्तीवर हिंगे, भोस आणि इतर शेतकऱ्यांमधील शेतीच्या रस्त्यावरील जुना वाद अखेर मिटला आहे. या वादामुळे शेतीकाम आणि वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण झाला होता. वादी लताबाई भास्कर हिंगे यांनी शिरूर तहसील कार्यालयात याबाबत लेखी तक्रार दिली होती. त्यानंतर माजी तहसीलदार बाळासाहेब म्हस्के यांनी स्थळ पाहणी करून हा प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घेतला.
दि. १८ जून २०२५ रोजी तहसीलदार म्हस्के यांनी स्वतः उपस्थित राहून ५० मीटर लांबीचा अडवलेला शेती रस्ता खुला केला. मात्र, या प्रक्रियेदरम्यान वादी आणि प्रतिवादी यांच्यात तीव्र वाद उद्भवला. प्रतिवादी पक्षातील काही महिलांनी जेसीबीसमोर ठिय्या मांडून सरकारी कामात अडथळा निर्माण केला, ज्यामुळे दोन तास तणावपूर्ण वातावरण होते. तहसीलदारांनी कठोर भूमिका घेत अडथळा निर्माण करणाऱ्यांविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम ३५३ अंतर्गत गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले.
यानंतर मंडल अधिकारी नंदकुमार खरात, ग्राम महसूल अधिकारी हर्षद साबळे, शिरूर पोलीस ठाण्याचे अंमलदार आणि महिला पोलिसांच्या उपस्थितीत पंचनामा पार पडला. “शेत रस्ते, शिवरस्ते, पाणंद रस्ते कृती समिती”च्या मध्यस्थीने दोन्ही पक्षांमध्ये समेट घडवून आणला गेला आणि वाद शांत झाला. या कामात कृती समितीचे प्रणेते शरद पवळे आणि दादासाहेब जंगले यांचा महत्त्वाचा पुढाकार होता.
यावेळी ॲड. सुप्रिया साकोरे, रवींद्र खुडे, निवृत्त पोलिस अधिकारी नानासाहेब काळे, प्रकाश वाखारे, फैजल पठाण, बाळासाहेब भोस, सोमनाथ गिरमकर, नाना कोहकडे यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते. हा प्रसंग स्थानिक प्रश्न सोडवण्यासाठी प्रशासन, शेतकरी आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या एकत्रित प्रयत्नांचे महत्त्व अधोरेखित करतो. महसूल प्रशासनाने स्पष्ट केले की, यापुढेही अडवलेले रस्ते टप्प्याटप्प्याने खुलके केले जातील. निमोणे गावातील हा वाद तहसीलदारांच्या प्रयत्नांमुळे आणि कृती समितीच्या मध्यस्थीने सकारात्मक मार्गी लागला, जे इतर गावांसाठी एक आदर्श उदाहरण ठरेल.





