Shirur News : शेतकऱ्यांचे पशुधन चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; शिरूर डी.बी. पथकाकडून दोघांना अटक
शिरूर परिसरात शेतकऱ्यांच्या गोठ्यांवर आणि शेतातील वस्त्यांवर डबा मारणाऱ्या (Shirur News) सराईत टोळीचा शिरूर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे.

Shirur News : शिरूर परिसरात शेतकऱ्यांच्या गोठ्यांवर आणि शेतातील वस्त्यांवर डबा मारणाऱ्या (Shirur News) सराईत टोळीचा शिरूर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. मध्यरात्रीच्या अंधारात मुक्या जनावरांवर डल्ला मारून पिकअपमधून पळवून नेणाऱ्या दोघांच्या मुसक्या आवळण्यात शिरूर पोलिसांच्या डी.बी. पथकाला यश आले असून, या कारवाईमुळे पशुधन चोरीचे दोन मोठे गुन्हे उघडकीस आले आहेत.
सरदवाडी परिसरातील न्हावरा फाटा ते चौफुला रस्त्यालगत (Shirur News) असलेल्या दादाभाऊ मगर यांच्या शेतात पाल टाकून राहणाऱ्या एका कुटुंबाच्या दोन म्हशी ११ ऑगस्टच्या मध्यरात्री अचानक गायब झाल्या. सकाळी हा प्रकार समोर येताच परिसरात एकच खळबळ उडाली.
अज्ञात चोरट्यांनी ८० हजार रुपये किमतीच्या या म्हशी चोरून नेल्या होत्या. याप्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच, पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांनी डी.बी. पथकाला आरोपींच्या मागावर पाठवले.
पथकाने घटनास्थळासह परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली, तांत्रिक विश्लेषण केले आणि गोपनीय खबऱ्यांचे जाळे सक्रिय केले. संशयित आरोपी रामनाथ सलिम भोसले (वय ३१, रा. पाण्याची टाकी, शिरूर) हा शिरूर (Shirur News) बाजारपेठेत येणार असल्याची पक्की माहिती पोलीस अंमलदार नितेश थोरात यांना मिळाली. क्षणाचाही विलंब न लावता पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील पथकाने बाजारपेठेत सापळा रचून रामनाथला शिताफीने ताब्यात घेतले.
पोलिसी खाक्या दाखवताच त्याने साथीदारासह चोरीची कबुली दिली. धक्कादायक म्हणजे, चौकशीच्या फेऱ्यात त्याने आणखी एका गुन्ह्याची वाच्यता केली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तपास चक्र वेगाने फिरवून चोरीचे पशुधन विकत घेणाऱ्या जावेद बबन पठाण (वय ३७, रा. वाळकी, जि. अहिल्यानगर) यालाही बेड्या ठोकल्या.
या संयुक्त कारवाईत पोलिसांनी चोरीला गेलेल्या दोन म्हशी, दोन बैल आणि गुन्ह्यात वापरलेले पिकअप वाहन असा एकूण ५ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. न्यायालयाने दोन्ही आरोपींना पोलीस कोठडी सुनावली असून पोलीस हवालदार अक्षय कळमकर पुढील तपास करत आहेत.
ही धडक कारवाई पोलीस अधीक्षक संदिप सिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक डॉ. शुभम कुमार, उपविभागीय पोलीस अधिकारी रविंद्र भोसले आणि पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक शुभम चव्हाण, अक्षय कळमकर, नितेश थोरात, विजय शिंदे, राहुल वाघमोडे, अंबादास थोरे, नीरज पिसाळ, निखील रावडे, सचिन भोई, अजय पाटील आणि दादाराव नागरे (Shirur News) यांच्या पथकाने केली.






