Shirur Bazar Samiti Election: शिरूर बाजार समितीसाठी राष्ट्रवादीचा मास्टरप्लॅन; आज रंगणार इच्छुकांच्या मुलाखती, कुणाला मिळणार संधी?
Shirur Bazar Samiti Election: शिरूर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस सज्ज; मंगळवारी रांजणगाव येथे इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतींचा धडाका.

Shirur Bazar Samiti Election – शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जोरदार तयारी सुरू केली असून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यासाठी मंगळवार (दि.१६) रोजी सकाळी १० वाजता रांजणगाव येथील राजमुद्रा चौकातील ग्रँड विस्टा हॉटेलमध्ये महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन केले आहे, अशी माहिती शिरूर-आंबेगाव राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष मानसिंग पाचुंदकर पाटील यांनी दिली. दरम्यान, या मुलाखतीकडे राजकीय वर्तुळाचे विशेष लक्ष लागले आहे.
बाजार समिती निवडणुकीत पक्षाच्या अधिकृत उमेदवारीसाठी इच्छुक असलेल्या कार्यकर्त्यांच्या मुलाखती घेऊन त्यांच्या कामाचा आढावा, संघटनात्मक ताकद आणि मतदारांमधील प्रभाव यांचा विचार केला जाणार असल्याचे समजते. यावेळी माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, शिरूर-हवेलीचे आमदार माऊली कटके, राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्हाध्यक्ष राजेंद्र कोरेकर यांच्यासह पक्षाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. शिरूर बाजार समितीची निवडणूक प्रतिष्ठेची मानली जात असून विविध राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.
अशा परिस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या या बैठकीत उमेदवार निवडीबाबत महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पक्ष संघटना मजबूत ठेवत सर्व घटकांना सोबत घेऊन निवडणुकीची रणनीती आखण्यावर बैठकीत भर दिला जाणार आहे. दरम्यान, इच्छुक उमेदवारांनी वेळेत उपस्थित राहून आवश्यक माहिती सादर करावी, असे आवाहन तालुकाध्यक्षांनी केले आहे. बाजार समिती निवडणुकीच्या अनुषंगाने होणारी ही बैठक आगामी राजकीय समीकरणांसाठी दिशादर्शक ठरणार असल्याची चर्चा कार्यकर्त्यांमध्ये सुरू आहे.





